मोदी इस्लामाबाद भेटीवर येतील, पाक अब्जाधीशाचा दावा

पाकिस्तान मधील निशात ग्रुपचे प्रमुख आणि अब्जाधीश मिया मान्शा यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात पडद्यामागे बोलणी सुरु असल्याचा दावा केला असून आम्ही एकत्र काम केले तर एक महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्लामाबाद दौरा करू शकतात असे म्हटले आहे. ते म्हणतात, कुणीच कुणाचा कायम शत्रू नसतो. भारताबरोबर चांगले संबंध ठेवणे ही आजची गरज बनली आहे.

मान्शा म्हणाले, १९६५च्या युद्धापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात ५० टक्के व्यापार होता. आत्ता दोन्ही देशांना शांतीची गरज आहे. भारताकडे चांगले तंत्रज्ञान आहे आणि आमच्याकडे सुद्धा हिंदुस्थानला देता येतील अशा अनेक गोष्टी आहेत. कुणी कुणाचा कायम शत्रू राहू शकत नाही. आमच्या कडे गरिबी खूप आहे त्यामुळे दोन्ही देशातील संबंध सुधारणे आणि त्यासाठी बोलणी करणे आवश्यक ठरते. विशेष म्हणजे पाकिस्तानने त्यांच्या पहिल्याच राष्ट्रीय सुरक्षा नीती मध्ये शांततेवर अधिक भर दिला आहे.

या संदर्भात पाकिस्तानच्या एक्स्प्रेस ट्रिब्युनशी बोलताना एका पाकिस्तानी अधिकाऱ्याने पुढील १०० वर्षे भारताशी वैर नसेल असे सांगताना शेजारी राष्ट्रात शांतता नांदली तरच प्रगतीचा वेग वाढेल असे म्हटले होते. पूर्वी प्रमाणेच भारताबरोबर व्यापार आणि व्यावसायिक नाते सामान्य झाले पाहिजे असे त्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी देशाची नवी राष्ट्रीय सुरक्षा नीती लाँच केली असून त्यातील १ टक्का भाग सार्वजनिक केला आहे तर बाकी कलमे गुप्त ठेवली गेली आहेत. ही नीती बनविताना पाकिस्तानी सेनेने मुख्य भूमिका बजावली असल्याचेही समजते. सेना अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार भारतात मोदी सरकार असेपर्यंत भारताबरोबर मिलाप शक्य नाही.

मात्र अफगाणिस्थान मध्ये तालिबानी सत्ता आल्यापासून भारत आणि पाक यांच्यात पडद्यामागे बोलणी सुरु आल्याचे दावा मान्शा यांनी केला असून युएईने भारत पाक मैत्रीसाठी प्रयत्न चालविले असल्याचे सांगितले जात आहे.