प्रभासचा आदिपुरुष एकाचवेळी २० हजार स्क्रीनवर होणार रिलीज
हिंदी चित्रपट क्षेत्रात कमाईमध्ये अव्वल ठरलेल्या दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या बाहुबली नंतर आता पुन्हा एकदा नवे रेकॉर्ड नोंदविले जाणार असल्याचे वृत्त आहे. प्रभासची प्रमुख भूमिका असलेला ‘ आदिपुरुष’ बाहुबलीची सर्व रेकॉर्ड तोडेल असे सांगितले जात आहे. ११ ऑगस्ट २०२२ रोजी हा चित्रपट जगभरात एकाच वेळी २० हजार स्क्रीनवर रिलीज होणार असून एकाच वेळी इतक्या मोठ्या संख्येने रिलीज होणारा हा पहिलाच चित्रपट असेल. विशेष म्हणजे प्रमुख भारतीय भाषा शिवाय इंग्रजी भाषेत हा चित्रपट आहेच पण इंडोनेशिया, श्रीलंका, जपान, चीन मध्येही तेथील प्रादेशिक भाषांत हा चित्रपट रिलीज करण्याची तयारी केली गेली आहे.
११ ऑगस्ट रोजी जगभरात प्रभास भगवान राम या भूमिकेत दिसेल. त्याच्याबरोबर सीतेच्या भूमिकेत कृती सेनन आणि रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान आहेत. कृती सांगते, तिच्यासाठी ही घटना खास आहे. सीतेची भूमिका हे मोठे आव्हान आणि जबाबदारी होती. सीता साकारण्याची संधी मिळाली याचा आनंद वाटतो. प्रभास आणि सैफ बरोबर तिने प्रथमच काम केले आणि या दोघांचे सहकार्य फारच छान होते.
आदिपुरुषचे दिग्दर्शक ओम राउत यांनी यापूर्वी अजय देवगण बरोबर ‘तानाजी’ चित्रपट केला होता. तानाजीनेही २०२० मध्ये सर्वाधिक कमाई केली आहे. आदिपुरुषचे बजेट ४०० कोटींचे असल्याचे सांगितले जात आहे.