भारत सरकारचा एलोन मस्कच्या कर सवलत मागणीस स्पष्ट नकार

जगातील श्रीमंत व्यक्ती असा लौकिक, टेस्ला सारख्या नामवंत कार्सचा उत्पादक, स्टारलिंक प्रोजेक्ट, स्पेस एक्सचा मालक अशी बिरुदे असणाऱ्या एलोन मस्क यांच्या कोणत्याही प्रकारच्या दबावाला दाद न देता भारत सरकारने मस्क यांना अपेक्षित असलेल्या आयात कर सवलती देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मस्क यांच्या साठी हा मोठा झटका मानला जात आहे. भारतात टेस्लाचे उत्पादन कराल अशी खात्री अगोदर द्या आणि मगच आयात कर सवलतीचा विचार केला जाईल असे केंद्रीय जड उद्योग मंत्रालयाने मस्क यांनी सांगितले आहे.

मस्क त्यांच्या टेस्ला कार्सची विक्री भारतात करण्यास अतिशय उतावळे झाले आहेत. गेले वर्षभर त्यांच्या कंपनीचे अधिकारी दिल्ली मध्ये बैठका करत आहेत. पण मोदी सरकारने लागू केलेल्या मेड इन इंडिया योजनेखाली भारतात टेस्लाने गुंतवणुकीची कोणतीही ठोस योजना सादर केलेली नाही. स्थनिक उत्पादनांना प्रोत्साहन आणि रोजगार निर्मिती साठी केंद्राने मेड इन इंडिया योजना सुरु केली आहे.

भारत सरकार ४० हजार डॉलर्सपेक्षा अधिक किमतीच्या आयात कार्सवर १०० टक्के आयात कर आकारते, त्यात शिपिंग आणि विमा समाविष्ट आहे. या पेक्षा कमी किमतीच्या कार्सवर ६० टक्के आयात कर लावला जातो. मस्क यांचा सरकारने आयात करात सवलती द्याव्यात यासाठी प्रयत्न आहे. पण केंद्रीय मंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार मस्क यांच्याबाबत अपवाद करून या उद्योगाला कोणताही चुकीचा संदेश दिला जाणार नाही. कारण देशात अगोदरच मारुती, ह्युंदाई, टाटा, महिंद्र या उद्योगांनी मोठी गुंतवणूक या क्षेत्रात केली आहे. टेस्ला ला फक्त येथे आयात कार्स विक्री करायच्या आहेत आणि उत्पादन मात्र परदेशात करायचे आहे. त्यामुळे त्यांना आयात करात कोणतीही सवलत दिली जाणार नाही असे स्पष्टपणे सांगितले गेले आहे.

भारतात इलेक्ट्रिक कार बाजारात टेस्ला साठी स्पर्धा सोपी नाही. टाटा, महिंद्रा या स्वदेशी कंपन्या आणि मारुती, ह्युंदाई, एमजी, मर्सिडीज, जेएलआर अगोदरच बाजारात उपस्थित आहेत. भारतात इलेक्ट्रिक वाहन उद्योगाचा करोना काळात सुद्धा अति जलद विकास झाला असून त्यामुळे अनेक कंपन्यांना भारताची बाजारपेठ आकर्षित करत आहे. २०२६ पर्यंत ४७ अब्ज डॉलर्सची पातळी हा बाजार गाठू शकेल असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.