गुगल सीईओ, पद्मभूषण सुंदर पिचाई यांच्याविरोधात एफआयआर

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना नुकताच देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण दिला गेला असला तरी पिचाई यांच्या अडचणी संपताना दिसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई पोलिसात पिचाई आणि गुगलच्या अन्य काही अधिकाऱ्यांच्या विरोधात कॉपी राईट प्रकरणी एफआयआर दाखल झाला आहे. फिल्म निर्माते सुनील दर्शन यांनी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हा एफआयआर पिचाई यांच्या विरोधात दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार सुनील दर्शन यांचा ‘एक हसीना थी, एक दिवाना था’ हा चित्रपट युट्यूब वर कोणतीही परवानगी न घेता अपलोड केला गेला आहे. या चित्रपटाचे सर्व अधिकार सुनील यांच्या कडे आहेत आणि त्यांनी ते कोणालाही विकलेले नाहीत. युट्यूबवर यांनी हा चित्रपट लोड केलेला नाही. युट्यूबचे लाखो युजर्स या चित्रपटातील कंटेंटचा वापर करत आहेत आणि लाखो वेळा हा चित्रपट युट्यूबवर पाहिला गेला आहे यामुळे निर्मात्याचे मोठे नुकसान झाले आहे. हा सरळ सरळ कॉपी राईट कायद्याचा भंग असल्याचे समजते.

सुनील दर्शन म्हणाले २०१७ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. युट्यूबवर तो अपलोड केल्यामुळे आम्हाला नुकसान सोसावे लागले आहे. गेली कित्येक वर्षे ते या संदर्भात युट्यूबविरुद्ध युद्ध लढत आहेत पण युट्यूब कडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. गुगल प्लॅटफॉर्मवरून हा कंटेंट हटवावा अशीही विनंती सुनील यांनी वारंवार केली पण त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या संदर्भात न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने पोलिसात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले त्यानुसार कॉपी राईट कायदा कलम ५१,६३,५९ खाली सुंदर पिचाई आणि अन्य काही अधिकरयांच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे. सुनील यांनी त्यांना हे प्रकरण अधिक वाढवायचे नसून समझोता करण्याची तयारी दाखविली आहे असेही समजते.