एक्सरेच्या नव्या तंत्राने त्वरित होणार करोनाचे निदान

आरटीपीसीआर न करताही करोना संसर्ग आहे का नाही याची चाचणी त्वरित होऊ शकेल असे नवे एक्स रे तंत्रज्ञान विकसित केले गेले असून ज्या देशात आरटीपीसीआर चाचण्याचे प्रमाण खूप कमी आहे त्यांना हे तंत्रज्ञान वरदान ठरणार आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्ट स्कॉटलंड मधील वैज्ञानिक प्रोफेसर नईम रमजान, गॅब्रियल ओकोलो व डॉ. स्टामोज स्कॉटलंड यांनी ही नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यात आर्टीफीशीयल इंटेलीजंस म्हणजे एआय च्या मदतीने काही मिनिटात करोना संक्रमण झाले आहे वा नाही याचा निर्णय मिळतो.

या नव्या तंत्रज्ञानात करोना संक्रमण, निरोगी व्यक्ती, व्हायरल निमोनिया पिडीत अश्या तीन हजार एक्सरे इमेज डेटा असून डीप कन्व्हेन्शनल न्यूरल नेटवर्क एआय तंत्रज्ञान अल्गोरिदमच्या सहाय्याने व्हिज्युअल इमेजचे विश्लेषण करून संसर्ग आहे वा नाही हे ठरवते. या चाचण्या ९८ टक्के अचूक निदान करतात असे समजते. त्यामुळे करोना संसर्ग असल्यास त्वरित उपचार सुरु होऊ शकतात आणि संक्रमण दर कमी होण्यास मदत मिळते.

विशेष म्हणजे भारतात डीआरडीओ ने मे २०२१ मध्येच एटीएमएएन  एआय नावाचे सॉफ्टवेअर विकसित केल्याची घोषणा केली होती. त्यात छातीच्या एक्सरे वरून करोना संसर्ग ओळखता येत होते. याचेही रिपोर्ट ९६.७३ टक्के अचूक आले आहेत. याच्या मदतीने वेगाने टेस्टिंग करणे शक्य आहे तरीही देशात मुख्यता आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्यांवर प्रामुख्याने भर दिला जात आहे.