देशात बनली प्राण्यांसाठी करोनाची स्वदेशी लस

हरियानाच्या हिस्सार येथील केंद्रीय अश्व अनुसंधान संस्थेत वैज्ञानिकांनी प्राण्यांसाठी देशातील पहिली कोविड लस बनविण्यात यश मिळविले आहे. सेनेतील २३ श्वानांवर या लसीच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून लस दिल्यावर या कुत्र्यांमध्ये २१ दिवसांनी करोना विरुद्धच्या अँटीबॉडीज म्हणजे प्रतिपिंडे तयार झाल्याचे दिसून आले. यानंतर गुजराथच्या जुनागढ सक्करबाग प्राणीसंग्रहालयातील १५ सिंहाना ही लस दिली जाणार आहे. त्यासाठी गुजराथ सरकारच्या परवानगीची प्रतीक्षा आहे असे समजते. त्यानंतर ही लस बाजारात आणली जाणार आहे.

वैज्ञानिक डॉ. नवीनकुमार म्हणाले सार्स करोना कोविड १९ हा विषाणू कुत्री, मांजरे, चित्ता, सिंह, तरस, हरणे या प्राण्यांमध्ये जगभर प्रामुख्याने सापडला आहे. चेन्नईच्या प्राणीसंग्रहालयातील सिंहाचा मृत्यू करोना मुळे झाल्याचे उघड झाले होते. या सिंहाचा मृत्यू करोनाच्या डेल्टा व्हेरीयंट मुळे झाला होता. माणसाना सुद्धा डेल्टा व्हेरीयंट चा संसर्ग मोठा होता. यामुळे डेल्टा संसर्ग झालेल्या माणसाच्या शरीरातील विषाणूच प्रयोगशाळेत आयसोलेट केला गेला आणि त्यापासून ही लस बनविली गेली. हा विषाणू माणसांकडून प्राण्यात आणि प्राण्यांकडून माणसात संक्रमित होत असल्याने प्राण्यांमध्ये सुद्धा कोविड नियंत्रण गरजेचे बनले आहे.

अमेरिका, रशियाने यापूर्वीच प्राण्यांना कोविड लस देणे सुरु केले आहे आता भारतात सुद्धा प्राण्यांचे कोविड लसीकरण सुरु केले जाणार असून केंद्र सरकार त्याबाबत गंभीर विचार करत आहे.