यंदाच्या प्रजासत्ताक दिन परेडला विदेशी पाहुणे नाहीत

यंदा २६ जानेवारी रोजी दरवर्षीप्रमाणे राजपथावर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाला परदेशी राष्ट्रपती अथवा पंतप्रधान यांना प्रमुख पाहुणे म्हणून  आमंत्रण दिले गेलेले नसल्याचे केंद्र सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितले गेले आहे. दरवर्षी राजपथावर होणाऱ्या या संचालनात परदेशी राष्ट्राध्यक्ष अथवा पंतप्रधानांना आमंत्रण देण्याची परंपरा आहे. या वर्षी ५ बड्या देशांच्या प्रमुखांना बोलाविण्याची योजना आखली गेली होती मात्र देशात करोनाचा प्रसार वेग पुन्हा वाढल्याने हा निर्णय रद्द केला गेला असे समजते.

गतवर्षी कोविड १९ साठी लागू केलेले प्रोटोकॉल पाळून परेड झाली होती आणि त्यावेळी फक्त २५ हजार प्रेक्षकांना परेड साठी उपस्थित राहण्यास परवानगी दिली गेली होती. यंदा २४ हजार प्रेक्षकांना परवानगी दिली गेली आहे. रक्षा मंत्रालयातून मिळालेल्या माहितीनुसार यंदापासून गणतंत्र दिवस कार्यक्रम २४ जानेवारी ऐवजी २३ जानेवारी पासून सुरु होणार आहेत. २३ जानेवारी हा नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती दिवस आहे.

या वर्षी गुप्तचर यंत्रणांनी गणतंत्र दिवशी दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याचा इशारा दिला असून त्यामुळे सुरक्षा व्यवस्था वाढविली गेली आहे. दहशतवादी, हायप्रोफाईल नेते आणि सुरक्षा संस्थाना निशाना बनवू शकतात तसेच गर्दीच्या जागा आणि बाजार दहशतवाद्यांच्या रडारवर असू शकतात असे संकेत मिळाले आहेत.