इटलीमध्ये करोना संक्रमितांसोबत पार्टीचा नवा ट्रेंड

करोना महामारीचा मोठा फटका पहिल्या दोन लाटांमध्ये इटलीला फार मोठ्या प्रमाणावर बसला असला तरी सध्या येथे तरुणाई मध्ये नवा ट्रेंड आला असून करोना लस घ्यायला लागू नये म्हणून पैसे देऊन लोक करोना संक्रमित लोकांसोबत वाईन पार्टी आणि डिनर पार्ट्या करण्यावर भर देत आहेत. करोनाचे नवे ओमिक्रोन व्हेरीयंट जगभरात धुमाकूळ घालत असल्याने अनेक देश बुस्टर डोस देण्याची तयारी करत आहेत त्या पार्श्वभूमीवर इटली मधील लोक मात्र लस अजिबात घ्यावी लागू नये यासाठी असले मार्ग शोधत आहेत असे समजते.

या नव्या ट्रेंडला ‘अँटी वॅक्सर’ म्हटले जात आहे. डेली मेलच्या बातमीनुसार आपल्याला करोना व्हावा म्हणून येथील नागरिक अगदी १६० डॉलर्स खर्च करून करोना झालेल्यांना वाईन आणि डिनर साठी निमंत्रण देत आहेत. करोना लस आपल्या शरीराला नुकसान पोहोचवेल अशी भीती अनेक तरुण लोकांच्या मनात आहे.

सरकारी आदेशानुसार १ फेब्रुवारी २०२२ पासून ५० वर्षांच्या वरील सर्वाना लस घेणे बंधनकारक केले गेले आहे. अन्यथा दंड आणि नोकरीत असल्यास नोकरीवरून कमी केले जाणार आहे. करोना संक्रमण जनादेश संदर्भात घोषणा झाल्यावर संक्रमित लोकांच्या बरोबर फिरणे, राहणे, भेटणे आणि पार्टी करणे याला जोर चढला आहे. आपल्याला सुद्धा करोना झाला की पास मिळेल आणि लस घ्यावी लागणार नाही असा येथील नागरिकांचा समज आहे. त्यामुळे नागरिक जाहिरात देऊन, पैसे देण्याचे आमिष दाखवून करोना संक्रमित लोकांना पार्टीसाठी बोलावीत आहेत असे पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे.