आयपीएल २०२२ भारताबाहेर होणार?

गेल्या काही वर्षाप्रमाणे यंदाही आयपीएल २०२२ चा १५ वा सिझन भारताबाहेर होऊ शकेल असे संकेत मिळत आहेत. भारतात सध्या करोनाची तिसरी लाट आली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही लाट ओसरली नाही तर आयपीएलचे सामने भारताबाहेर खेळविले जातील अशी शक्यता आहेत. त्यासाठी द.आफ्रिकेला पहिली पसंती दिली जात आहे तर अन्य पर्यायात श्रीलंकेबाबत विचार केला जात असल्याचे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

गुरुवारी या संदर्भात या अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले कि, करोना लाट कायम राहिली तर आयपीएलचे सामने अन्यत्र खेळविले जातील पण यावेळी युएई मध्ये सामने होणार नाहीत. द. आफ्रीकेबाबत विचार सुरु आहे आणि हे सामने खरेच येथे खेळविले गेले तर आयपीएल सामने द. आफ्रिकेत होण्याची ही दुसरी वेळ असेल. यापूर्वी २००९ मध्ये देशात सार्वत्रिक निवडणुका होत्या तेव्हा आयपीएल द. आफ्रिकेत झाली होती. दुसरे कारण म्हणजे येथे खेळाडूंसाठी चांगली हॉटेल्स असून खेळाडू येथे बायोबबल मध्ये सुरक्षित राहू शकतात. द. आफ्रिकेचा टाईम डिफरन्स सुद्धा खेळाडूंसाठी योग्य ठरतो.

यंदा आयपीएल मध्ये दोन नवे संघ सामील झाले आहेत. संघांची संख्या १० वर गेल्याने हे सामने अधिक काळ चालणार आहेत. काही कारणाने द.आफ्रिकेत सामने होऊ शकले नाहीत तर श्रीलंकेचा पर्याय विचारात घेतला जाईल असे समजते. २०२१ आयपीएल १४ वा सिझन ४ मे पासून करोना संक्रमित खेळाडूंची संख्या वाढत चालल्याने थांबविला गेला होता आणि उर्वरित सामने युएई मध्ये खेळविले गेले होते.