लसूण घातल्यानंतर पदार्थाला आगळीच, खमंग चव येते हे जरी खरे असले, तरी अनेकांना लसुणाचा पदार्थाला येणारा वास काहीसा नापसंत असतो. जेव्हा लसुणाचा खमंगपणा हवा पण वास मात्र फारसा नकोसा असला, तर अशा वेळी काळ्या लसुणाचा वापर करावा. या शिवाय काळ्या लसुणाचे आरोग्याच्या दृष्टीनेही अनेक फायदे आहेत. म्हणूनच प्राचीन काळापासून काळ्या लसुणाचा उपयोग औषधी म्हणूनही करण्यात येत आहे. या लसुणाचा उपयोग आशियायी खाद्य परंपरेमध्ये मोठ्या प्रमाणावर होताना पहावयास मिळतो. कोरिया देशाने तर काळ्या लसुणाचा वापर करून हेल्थ प्रोडक्ट तयार केले आहे, तर थायलंडमध्ये काळ्या लसुणाचा वापर करून बनविलेली चॉकलेट्स लोकप्रिय आहेत.
काळा लसूण म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, जून झालेला लसूण असतो. हा लसूण चवीला थोडा गोडसर असून, एखाद्या जेलीप्रमाणे मऊ असतो. हा काळा लसूण नैसर्गिक रित्या तयार होत नसून, ताज्या लसुणाला दहा दिवस चाळीस ते साठ अंश सेल्सियस तापमानावर ‘फर्मेंट’ करून हा लसूण तयार केला जातो. या लसुणाचा वापर अनेक पदार्थांमध्ये केला जातो. सध्या हा लसूण अतिशय लोकप्रिय होत असून, हा ऑनलाईन उपलब्ध आहे. या लसुणाच्या सेवनाचे अनेक फायदे पाहिले गेले आहेत.
काळ्या लसुणाच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. अनेक व्हायरस, बॅक्टेरिया, आणि फंगस यांपासून होणारे इन्फेक्शन रोखणारी तत्वे या लसुणामध्ये आहेत. तसेच अनेक त्वचारोगांसाठी देखील याचे सेवन उत्तम आहे. ज्यांना लिव्हरसंबंधी काही विकार असतील, त्यांच्यासाठी देखील या लसुणाचे सेवन उत्तम आहे. काळ्या लसुणामध्ये अँटी ऑक्सिडंटस् मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे काळ्या लसुणाचे सेवन करण्यासाठी हा लसूण स्वयंपाकासाठी वापरण्याच्या तेलामध्ये मिसळून ठेवावा. या लसुणाच्या सेवनामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणामध्ये राहत असून, इंस्युलीनची पातळीही नियंत्रित राहते. या लसुणाच्या नियमित सेवनाने कर्करोगासारखे आजार टाळता येऊ शकतात. तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी देखील या लसुणाचे सेवन उत्तम आहे.
जाणून घेऊ या काळ्या लसुणाचे फायदे
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही