प्रवासासाठी विमा करविताना घ्या ही खबरदारी

travel-i
सुट्टीच्या किंवा काही कामानिमित्त परदेशगमनाचा कार्यक्रम निश्चित झाला, की त्यासाठी आवश्यक अनेक गोष्टींची तयारी काही दिवस आधीपासूनच करावी लागते. पासपोर्ट, व्हिसा, हॉटेलची बुकिंग्ज, परदेशी चलन या सर्व व्यवस्थेबरोबरच आणखी एक गोष्ट महत्वाची असते. ती गोष्ट म्हणजे ट्रॅव्हल इंस्युरंस, किंवा प्रवासासाठी विमा करविणे. हा विमा करविणे अतिशय आवश्यक आहे. परदेशामध्ये गेल्यानंतर अचानक आलेले लहान-मोठे आजारपण, सामान हरविणे किंवा चोरीला जाणे, इत्यादी अडचणींच्या प्रसंगी हा विमा उपयोगी येतो. किंबहुना काही देशांनी तिथे येणाऱ्या प्रत्येकासाठी हा विमा बंधनकारक केला आहे.
travel-i2
अनेकदा ऐनवेळी विमान रद्द झाल्याने, किंवा पासपोर्टचे प्रोसेसिंग होण्यास उशीर झाल्याने, अचानक झालेले अपघात किंवा आजारपण अशा कारणांमुळे प्रवास रद्द झाला, तर या विम्याच्या मदतीने आपण भरलेल्या एकूण प्रवासखर्चातील काही रक्कम आपल्याला परत मिळू शकते. त्या दृष्टीनेही हा विमा उतरविणे महत्वाचे ठरते. अर्थातच निरनिराळ्या कंपन्यांचे या बाबत निरनिराळे नियमही आहेत. परदेशी गेले असताना जर लहान-मोठे आजारपण उद्भविले, तर औषधोपचारांसाठी होणारा खर्च या विम्याद्वारे परत मिळविता येतो.
travel-i1
अनेकदा परदेशी गेले असताना आपले सामान हरविणे, किंवा चोरीला जाणे अशा घटनाही घडतात. अश्यावेळी झालेले नुकसान या विम्याने भरून काढता येते. त्यामुळे परदेशी प्रवासाला जाताना विमा करविणे अत्यावश्यक ठरते. हा विमा कराविणाऱ्या अनेक कंपन्या असून, यांचे नियम, विम्यासाठी भरावे लागणारे प्रीमियम, वेगवेगळे असू शकतात. हा विमा घेताना काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. सर्व इंश्युरंस कंपन्या सर्वच देशांसाठी विमा देतात असे नाही. त्यामुळे पॉलिसी विकत घेण्यापूर्वी आपण जाणार असू त्या देशासाठी विमासुरक्षा उपलब्ध असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच परदेशामध्ये असताना मेडिकल इमर्जन्सी आलीच तर कंपनीशी संपर्क साधता येण्यासाठी कंपनीची हेल्पलाईन त्या देशामध्ये उपलब्ध असल्याचीही खात्री करून घ्यावी. बहुतेक कंपन्या विम्याकरिता आकारात असलेले प्रीमियमच्या दरांची माहिती ऑनलाईन उपलब्ध असल्याने यांची माहिती आधीपासूनच करून घेता येते. त्यामुळे कंपन्यांचे प्रीमियम, नियम इत्यादी जाणून घेऊन मगच कोणत्या कंपनीतून विमा खरेदी करायचा याचा निर्णय घ्यावा.

Leave a Comment