चला फेरफटका मारू या, ‘खाऊ गल्ली’ मध्ये

food2
मुंबईतील घाटकोपर (ईस्ट)च्या स्टेशनवरून बाहेर पडल्यानंतर, गांधी मार्केटच्या नजीक असलेल्या वल्लभ बाग लेनच्या जवळ जात असतानाच, निरनिराळे खमंग सुगंध नाकाशी दरवळू लागले, की आपण मुंबईमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या आणि मुंबई बाहेरही ख्याती असलेल्या ‘खाऊ गल्ली’ मध्ये आल्याची खूण पटते. अस्सल खवय्यांच्या मनपासंतीचे हे ठिकाण आहे. मात्र या ठिकाणी मांसाहारी पदार्थ फारसे उपलब्ध नाहीत. पण म्हणून मांसाहारी लोकांनी निराश होण्याचे काहीच कारण नाही. त्यांना उत्तमोत्तम मांसाहारी पदार्थांचाही क्षणभर विसर पडेल इतके चविष्ट शाकाहारी पदार्थ खाऊ गल्लीमध्ये चाखावयास मिळत असतात.
food1
खाऊ गल्लीमध्ये देशी आणि परदेशी, हर तऱ्हेच्या पदार्थांची विविधता आहे. ‘बार्बेक्यू’, किंवा पास्ता, पिझ्झा सारख्या पदार्थांच्या अनेक प्रकारांपासून ते अस्सल देशी डोसा, पाणीपुरी ते ‘खिचू’ पर्यंतच्या सर्व तऱ्हा येथे चाखण्यासाठी मिळू शकतात. अनेक तऱ्हेचे पदार्थ चाखून पाहण्याच्या इच्छेने इथे आलेल्या खवय्यांसाठी ही खाऊ गल्ली, जणू अलिबाबाची गुहाच आहे.
food
येथे मिळणारी पाणीपुरी, चाट, येथील खासियत आहे, आणि त्याच्या जोडीला मुंबई स्पेशल ‘कटिंग चहा’ ही हवाच. या गल्लीमध्ये डोश्याच्या चाळीस निरनिराळ्या तऱ्हा पहायला मिळतात. डोश्याच्या या विविधतेमध्ये ‘मॅगी चीज डोसा’, ‘मंचुरियन पास्ता डोसा’, ‘अमेरिकन चॉप्सी डोसा’, ‘चीज चॉकोलेट डोसा’ इत्यादी इतरत्र कुठेही पहावयास न मिळणारे प्रकार, खाऊ गल्लीमध्ये उपलब्ध असून, हे विशेष लोकप्रियही आहेत. आपल्या आहाराबाबत अतिशय जागरूक असणाऱ्या ‘कॅलरी कॉन्शस’ लोकांसाठी येथे तेल-बटर विरहित डोसेही बनविले जातात. त्यामुळे कॅलरीजची चिंता न करता आपल्या आवडत्या पदार्थांवर मनसोक्त ताव मारण्यासाठी संधी मिळताच, खाऊगल्लीमध्ये फेरफटका अवश्य मारून यावा.

Leave a Comment