मुदत उलटून गेलेली लस घेतल्यास हे होतील परिणाम
कोविड १९ लसीकरण कार्यक्रम भारतात वेगाने राबविला जात असून आता १५ ते १८ वयोगटातील युवा तसेच ६० वर्षे झालेल्या ज्येष्ठ व्यक्तींना बुस्टर डोस दिला जात आहे. बरेच वेळा अनवधानाने मुदत उलटून गेलेली म्हणजे एक्स्पायर झालेली लस दिली गेल्याच्या घटना जगात सर्वत्र घडल्या आहेत. यामुळे अशी लस दिली गेली तर त्याचे काय परिणाम होऊ शकतील अशी शंका अनेकांच्या मनात आहे.
अमेरिकेत एटीसी वॅक्सिन सर्विस कडून सुद्धा अशी मुदत उलटून गेलेली लस देण्याचा प्रकार घडला होता आणि त्याची माहिती त्वरित सरकारला दिली गेली होती. ५ ते १० जून या काळात फायझरची ही लस दिली गेली होती. पण त्यावर सरकारने या काळात फायझरची लस घेतलेल्या व्यक्तींनी पुन्हा नव्याने लस घ्यावी असा खुलासा केला होता. मुदत संपलेली लस घेतली असेल तर त्यापासून आरोग्याला काही धोका नाही असे सरकारने जाहीर केले होते.
तज्ञांच्या मते एक्स्पायर झालेल्या लसीतील काही घटक निष्प्रभ होतात त्यामुळे लस प्रभावी राहत नाही. अर्थात काही वेळा धोकादायक रीअॅक्शन येऊ शकते पण कोविड लसीबाबत अजून तरी अशी माहिती मिळालेली नाही. म्हणजे मुदत संपून गेल्यावर दिली गेलेली लस धोकादायक ठरल्याचा पुरावा अजून मिळालेला नाही.
बहुतेक लसींची एक्सपायरी डेट दोन ते तीन वर्षांची असते. पण कोविड लसीबाबत ही मुदत तीन ते नऊ महिने इतकी आहे. अनेक उत्पादक कंपन्या एक्सपायरी डेट वाढवून देण्याची मागणी करत आहेत. तज्ञ मुदतीनंतर सुद्धा काही महिने लस सुरक्षित राहते असा दावा करत आहेत.