ब्रह्मदेवाचे करोना लसीचे वेड

वय वाढते तशी बुद्धी भ्रष्ट होत जाते असे म्हणतात. जगात सध्या सर्वत्र करोना सावट आहे आणि कोविड लस घेण्यासाठी नागरिक प्रयत्न करत आहेत. अनेक देशात लसीचा पहिला डोस सुद्धा मोठ्या जनसंख्येला मिळालेला नाही. भारतात अनेकांना दोन डोस मिळाले आहेत. पण बिहार मधील एका व्यक्तीने मात्र या बाबत चमत्कार घडविला आहे. ब्रह्मदेव मंडल नावाच्या ८४ वर्षाच्या एका बुजुर्गाने विविध ठिकाणी जाऊन करोना लसीचे चक्क १२ डोस घेतले आहेत. त्यांना जणू या लसीचे व्यसन जडले आहे.

ब्रह्मदेव सांगतात, करोना लसीचा फार फायदा होतो आहे. त्यांची गुडघेदुखी बरी झाली. विशेष म्हणजे ब्रह्मदेव यांनी स्वतः काही काळ ग्रामीण डॉक्टर म्हणून काम केले आहे. मिडिया रिपोर्टनुसार ते जेव्हा लसीचा १२ वा डोस घ्यायला गेले तेव्हा त्यांची ही कामगिरी उघडकीस आली. कारण लसीकरण केंद्रावरील लोकांनी त्यांना ओळखले. दर वेळी मोबाईल नंबर बदलून त्यांनी लस घेतल्याचे उघड झाले. चिकित्सा अधिकारी सुद्धा या प्रकाराने हतबुद्ध झाले आहेत. अधिक तपास सुरु आहे.

ब्रह्मदेव यांनी प्रत्येक डोस कधी घेतला त्याची तारीख, वेळ आणि जागा यांची व्यवस्थित नोंद केली आहे. ते पोस्ट खात्यातून निवृत्त झाले असून वारंवार आयडी बदलून त्यांनी लसीचे १२ डोस घेतले आहेत. यामुळे त्यांच्यावर बेकायदा लस घेतल्याची कारवाई होऊ शकते असे सांगितले जात आहे.