महाराष्ट्रातील १३ मंत्री, ७० आमदारांना करोना
महाराष्ट्रात पुन्हा एकदा करोनाचा संसर्ग वेगाने वाढत चालला असून यावेळी करोनाने राजकीय नेत्यांना कवेत घेतल्याचे दिसत आहे. कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सरकारातील १३ मंत्री आणि सुमारे ७० आमदार करोनाच्या विळख्यात आल्याचे जाहीर केले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार अरविंद सावंत, युवा सेना नेते वरूण सरदेसाई, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, भाजप आमदार अतुल भातखळकर, राधाकृष्ण विखे पाटील, माधुरी मिसाळ, विद्या ठाकूर, समीर मेघे या नेत्यांच्या करोना चाचण्या सकारात्मक आल्या आहेत. याशिवाय मंत्री के.सी पडवी, यशोमती ठाकूर, कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात यांना यापूर्वीच करोना संक्रमण झाले आहे. यातील बहुतेकांना ओमिक्रोनची लागण झाली असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार या सर्व नेत्यांमध्ये लक्षणे अगदी सौम्य स्वरुपाची आहेत आणि कुणालाही रुग्णालयात दाखल करावे लागलेले नाही. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी अन कार्यालयात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला करोना संसर्ग झाला असून बाकीच्यांचे रिपोर्ट अजून मिळालेले नाहीत. मंगळवारी राज्यात १८४६६ नव्या केसेस आढळल्या असून २० मृत्यू झाले आहेत. ११ जणांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे तर ३९००० लोकांना घरीच आयसोलेशन मध्ये राहावे लागले आहे असे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. महाराष्ट्रात आता एकूण करोना बाधितांची संख्या ६७,३०,४९४ झाली आहे आणि मृतांची संख्या १,४१,५७३ वर गेली आहे.