कार्डेलिया क्रुझ पुन्हा चर्चेत, पण यावेळी करोना हे कारण

शाहरुख पुत्र आर्यन खान याला अमली पदार्थ प्रकरणात ज्या क्रुझवरून अटक झाली त्यावेळी विवादात सापडलेले कार्डेलिया क्रुझ पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. मात्र यावेळी करोना वरून हे क्रुझ पुन्हा चर्चेत सापडले आहे. या क्रुझ वरील काही क्रू मेंबर आणि ६६ प्रवाशाची करोना चाचणी पॉझीटिव्ह आल्याने गोवा बंदरात या जहाजावरील लोकांना खाली उतरण्यास बंदी केली गेली आहे. त्यामुळे जहाजातील क्रू मेंबर सह २०१६ लोक समुद्रात अडकून पडले असल्याचे समजते.

गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले कि क्रुझवरील सर्व लोकांची आरटीपीसीआर केली जात आहे. त्यातील ६६ प्रवासी आणि काही क्रू मेंबर्सचा करोना रिपोर्ट पॉझीटिव्ह आहे. त्यामुळे मुंबई वरून गोव्यात आलेले हे क्रुझ मोरमुगाओ पोर्ट क्रुझ टर्मिनल जवळ उभे असून कुणालाही जहाजावरून खाली उतरण्याची परवानगी दिली गेलेली नाही. करोना संक्रमिताना जहाजावरच आयसोलेट केले गेले आहे. सर्वांची आरटीपीसीआर पुन्हा केली जात असून त्याचे अहवाल येईपर्यंत कुणीही खाली उतरू शकणार नसल्याचे सर्व समुद्रात अडकून पडले आहेत.

महाराष्ट्रात करोनासाठी केलेला डिझास्टर मॅनेजमेंट कायदा लागू केलेला आहे. त्यानुसार विना मास्क सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी तसेच सोशल डीस्टन्सिंग पाळणे बंधनकारक आहे. आर्यन खान पार्टीचे जे व्हिडीओ समोर आले होते त्यात या क्रुझ वर हे नियम पाळले जात नसल्याचे दिसले होते. या क्रुझचे मुंबई गोवा, लक्षद्वीप, कोच्ची साठी बुकिंग करता येते. या क्रुझच्या परदेशी फेऱ्या २०२२ मध्ये सुरु होणार आहेत असेही समजते. या क्रुझवर रेस्टॉरंट,बार, स्विमिंग पूल, ओपन थियेटर, किड्स एरिया, कॉन्फरन्स रूम, मिनी हॉस्पिटल अश्या अनेक सुविधा आहेत. याचे भाडे माणशी १७ हजार ते ५४ हजार या दरम्यान आहे.