इस्रायल मध्ये सापडली फ्लोरोनाची पहिली केस
करोनाच्या ओमिक्रोनच्या फैलावण्याचा वेग लक्षात घेऊन इस्रायलने करोना लसीचा दुसरा बुस्टर डोस देण्याची सुरवात शुक्रवारी केली आणि दुसरा बुस्टर डोस देणारा जगातील पहिला देश बनला, मात्र आता तेथे नवे संकट उभे राहिले असून येथे फ्लोरोना म्हणजे इंफ्ल्यूएन्झा आणि करोना असे दोन्ही संसर्ग एकत्रित झालेला पहिला रुग्ण आढळला आहे. या संक्रमणाला फ्लोरोना म्हटले गेले असून एका गर्भवती महिलेला हा संसर्ग झाला आहे. रॉबिन मेडिकल सेंटर मध्ये या महिलेला दाखल केले गेले आहे. या संसर्गा बाबत अधिक अभ्यास सुरु असल्याचे आणि या दोन्ही विषाणूंचे कॉम्बीनेशन अधिक गंभीर असू शकेल का यावर लक्ष ठेवले जात असल्याचे समजते.
इस्रायल मिडियानुसार करोना आणि इंफ्ल्यूएन्झा असे दुहेरी संक्रमण झाल्याची जगातील ही पहिली केस आहे. इस्रायल नॅशनल हेल्थ प्रोव्हायडरच्या सांगण्यानुसार असे दुहेरी संक्रमण आणखी पसरले आहे का याची तपासणी करण्याचे काम हाती घेतले गेले आहे. दरम्यान करोना केसेस मध्येही वाढ होऊ लागल्याने कमी रोगप्रतिकार शक्ती असलेल्या आणि करोनाच्या लसीचे दोन्ही डोस, बुस्टर डोस घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांना बुस्टरचा दुसरा म्हणजे लसीचा चौथा डोस देण्यास सुरवात झाली आहे. करोना लसीचा बुस्टर डोस सर्व जनतेला दिला गेला पाहिजे अशी शिफारस करणारा इस्रायल हा पहिला देश होता असे समजते.
इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाचे संचालक नचमन ऐश म्हणाले, वृध्द सेवा सेंटर आणि अन्य जेष्ठ नागरिकांना दुसरा बुस्टर डोस देण्यास शुक्रवार पासून सुरवात केली गेली आहे. इस्रायलमध्ये करोनाची पाचवी लाट आली असून सध्या नव्या ओमिक्रोनच्या संक्रमितात वाढ होत आहे.