अमेरिकन डॉक्टर्सचा दावा, ओमिक्रोनच ठरेल करोनाची नैसर्गिक लस

करोनाच्या महाभयंकर ठरलेल्या डेल्टा व्हेरीयंट नंतर आलेल्या नव्या ओमिक्रोनने जगात दहशत बसविली असली तरी त्यावर सातत्याने संशोधन, अध्ययन होत आहे. यातून ओमिक्रोन डेल्टा इतका धोकादायक नाही, ओमिक्रोनचा संसर्ग वेगाने होत असला तरी रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे आणि मृत्यूचे प्रमाण सुद्धा कमी असल्याचे आकडे आता येऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एफशाईन इमरानी यांनी ओमिक्रोनला फैलावू द्या, कारण त्यामुळेच करोना विरुध्दची प्रतिकार शक्ती निर्माण होणार आहे.  ओमिक्रोनच करोनाची नैसर्गिक लस म्हणून काम करेल असा दावा केला असून त्याला इतर अनेक डॉक्टर्सकडून सहमती दर्शविली गेली आहे.

ओमिक्रोनवर जगभरातील संशोधक विविध प्रकारचे संशोधन आणि अध्ययने करत आहेत. मोठ्या प्रमाणावर डेटा एकत्र केला जात आहे. सध्या सर्व संशोधकांचा सूर ओमिक्रोन धोकादायक असल्याचा असला तरी प्रत्यक्ष रुग्णांवर उपचार करत असलेले डॉक्टर्स मात्र वेगळा अनुभव सांगत आहेत. डॉ. इमरानी यांनीही करोना काळात हजारो रुग्णांवर उपचार केले आहेत. ओमिक्रोनला घाबरू नका, तो डेल्टा पेक्षा कमी धोकादायक आहे असे त्यांचे सांगणे असून लॉकडाऊन, कर्फ्यू नकोत तर पूर्ण आबादीमध्ये ओमिक्रोन पसरू दे, त्यामुळेच लोकांची करोना विरुद्धची प्रतिकारशक्ती अधिक मजबूत होणार आहे असा त्यांचा दावा आहे.

नव्या संशोधनात असेही दिसले आहे कि ओमिक्रोन फुफुसात न वाढता श्वासनलिकेत वाढतो. पण श्वासनलिकेत अगोदरच एक इम्यून सिस्टीम असते जी या विषाणूला वेगाने वाढून देत नाही. त्यामुळे तो फुफ्फुसापर्यंत पोहोचत नाही. परिणामी रुग्णाला ऑक्सिजन देण्याची वेळ फार कमी वेळा येते. डॉ. इमरानी यांच्या मते श्वासनलिकेतच ओमिक्रोन विरुद्ध सिस्टीम सक्रीय होत आहे आणि या विषाणूला तेथेच निर्माण झालेल्या अँटीबॉडी नष्ट करत आहेत. हे वरदान मानले पाहिजे. याचाच अर्थ ओमिक्रोन नैसर्गिक लसीचे काम करत आहे. अर्थात ओमिक्रोन मुळे मृत्यू होणारच नाहीत असा त्यांचा दावा नाही. अन्य गंभीर आजार, लस न घेतलेल्यांना त्याचा धोका राहू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे.