पंतप्रधान मोदींची दुबई यात्रा करोना उद्रेकामुळे स्थगित

पंतप्रधान मोदींचा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणारा युएईचा दौरा करोना उद्रेकामुळे स्थगित करण्यात आला असल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले. पंतप्रधान ६ जानेवारीला रणनीतिक दृष्टीने महत्वाच्या खाडी देशांच्या दौऱ्यावर जाणार होते मात्र कोविड १९ चे नवे व्हेरीयंट ओमिक्रोनचे वाढते स्वरूप लक्षात घेऊन हा दौरा फेब्रुवारी पर्यंत पुढे ढकलला गेल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगितले गेले. भारत आणि युएई यांच्या कूटनीतिक संबंधाना पुढील वर्षी ५० वर्षे होत आहेत त्यानिमित्ताने हा दौरा ठरविला गेला होता.

भारत आणि युएई दोन्ही कडे ओमिक्रोनचा वेगाने प्रसार होत असल्याचे पाहून सावधानता बाळगली जात आहे. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही प्रवाशांची रँडम पीसीआर टेस्ट केली जात असून जारी केलेल्या नव्या आदेशानुसार ब्राझील, भारत, रशिया,पाकिस्तान मधून येणाऱ्या प्रवाशांना ही टेस्ट बंधनकारक केली गेली आहे. या देशांच्या यादीत ब्रिटनचा समावेश नाही. एमिरेट्सच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ब्रिटन मधून दुबईला येणाऱ्या सर्व प्रवाशांना ७२ तासातला कोविड १९ रिपोर्ट निगेटिव्ह असणे बंधनकारक आहे.