किक बॉक्सिंग वर्ल्ड चँपियन अंडरटेकर करोना शी लढत हरला

तीन वेळा किक बॉक्सिंग वर्ल्ड चँपियन बनलेला फ्रेडरिक सिनिस्ट्रा उर्फ अंडरटेकर याला करोना बरोबरच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. ४१ वर्षीय अंडरटेकरचे करोनामुळे नुकतेच निधन झाले. करोना म्हणजे बकवास आहे, करोना झालाच तर माझ्या शारीरिक बळाने मी त्याला पराभूत करेन अशी त्याची जिद्द होती आणि त्यामुळे त्याने करोनासाठी लागू केलेल्या गाईडलाईन्स कधीच पाळल्या नाहीत तसेच लस सुद्धा घेतली नव्हती असे समजते.

गेली दोन वर्षे अंडरटेकर करोनाची टर उडवीत होता आणि करोना लस म्हणजे धोका आहे असे सांगत होता. त्याला नोव्हेंबर मध्ये करोना झाला पण त्याने करोनाला मीच निपटीन, माझ्या शारीरिक ताकदीपुढे करोना काही करू शकत नाही असा हट्ट करून उपचार घेण्यास नकार दिला होता. अखेर त्याची तब्येत इतकी बिघडत गेली कि त्याला थेट आयसीयु मध्ये दाखल करावे लागले. पण तो पर्यंत खूपच उशीर झाला होता. रुग्णालयात भरती होतानाही त्याने चाहत्यांना आजारावर विजय मिळवून पुन्हा येईन असे आश्वासन दिले होते. पण अखेर त्याला जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीने सुद्धा अंडरटेकरचा मृत्यू करोना मुळे झाला हे मान्य केलेले नाही.