शाळेमध्ये दिलेला गृहपाठ करणे हा बहुतेक मुलांना नकोसा वाटणारा असतो. त्यातून गणित, विज्ञान अश्या अवघड विषयांचे गृहपाठ असतील, तर तो पूर्ण करणे तर अगदी जीवावरच येते. किंबहुना, आताची लहान मुलेच नव्हे, तर त्यांच्या पालकांना जरी, ‘शालेय जीवनातील सर्वात नावडती गोष्ट’ विचारली, तर बहुतेक पालकही गृहपाठ सर्वात नावडता असल्याची कबुली देतील. गृहपाठ भरपूर असला, की खेळण्यासाठी वेळ कमी, आणि गृहपाठ अवघड असला, तर तो करण्यासाठी वेळ आणि बौद्धिक शक्तीचा वापर जास्त, त्यामुळे बहुतेकवेळी गृहपाठ काहीशा नाखुशीनेच केला जात असतो.
पण या सर्व प्रश्नांवर उत्तर शोधून काढत न्यू जर्सी येथे राहणाऱ्या सहा वर्षांच्या चिमुरड्याने शक्कल लढवून गृहपाठ झटपट पूर्ण करण्यासाठी धमाल युक्ती शोधून काढली. त्याने शोधून काढलेली युक्ती वापरून गणिताचा गृहपाठ झटक्यात पूर्ण कसा केला याचा व्हिडियो सोशल मिडियावर नुकताच व्हायरल झाला आहे, आणि लोकांनी या चिमुरड्याच्या युक्तीचे कौतुकही केले आहे. सहा वर्षीय जेरीयल याची आई येरेलीन हिने हा व्हिडियो सोशल मिडियावर पोस्ट केला असून, आतापर्यंत या व्हिडियो सुमारे ८.३ मिलियन लोकांनी पाहिला आहे.
या व्हिडियोमध्ये जेरीयल चक्क ‘अलेक्सा’च्या मदतीने आपला गणिताचा गृहपाठ करताना दिसत आहे. अलेक्सा हे अॅमेझॉनचे ‘डिजिटल असिस्टंट’ आहे. तुमच्याशी संवाद साधणे, तुमची मनपसंत गाणी तुम्हाला ऐकविणे, तुमच्यासाठी तुम्ही सांगितल्या प्रमाणे गजर लावणे, तुमच्या निरनिराळ्या कामांची रिमाइन्डर्स देणे, तुम्हाला हवामानाची किंवा तुमच्या आसपासच्या वाहतुकीची माहिती देणे अश्या अनेक प्रकारच्या कार्यांमध्ये अलेक्सा तुमची मदत करीत असते. जेरीयलने मात्र अलेक्साची मदत ‘हटके’ पद्धतीने, म्हणजेच गृहपाठ करण्यासाठी घेतल्याचे पाहून त्याची आई मात्र थक्क झाली.
जेरीयलची आई येरेलीन दुसऱ्या खोलीमध्ये आपले काम करीत होती आणि जेरीयल बैठकीच्या खोलीमध्ये बसून गणिताचा गृहपाठ करीत होता.
अचानक जेरीयलच्या आवाजातील ‘पाच वजा दोन किती, अलेक्सा?’ हा प्रश्न आणि ‘पाच वजा दोन म्हणजे तीन’ असे अलेक्साच्या आवाजातील उत्तर ऐकून येरेलीन हातातील काम तातडीने बाजूला ठेऊन बाहेर आली. तेव्हा जेरीयल अलेक्साच्या मदतीने गणिताचा गृहपाठ करीत असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने आपल्या मोबाईल फोनवर हा सर्व प्रसंग चित्रित केला. गृहपाठ पूर्ण झाल्यांनतर लहानग्या जेरीयलने, गृहपाठ पूर्ण करण्यास मदत केल्याबद्दल अलेक्साचे आभारही मानले. हा व्हिडियो ट्वीटर वर व्हायरल झाला असून, याला ४.७ लाख ‘लाईक’ आले आहेत.