बद्धकोष्ठ दूर करण्याकरिता प्या मूग आणि पालकाचे सूप

soup
आपल्या भोजनाच्या सवयी, आपला आहार, आणि आपल्या शरीराला दिवसभरामध्ये होत असणारा व्यायाम, हालचाल, या गोष्टींवर आपण खात असलेल्या अन्नाचे पचन मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. जर पचनक्रिया सुरळीत नसेल, तर अपचन, बद्धकोष्ठासारख्या समस्या उद्भवतात. जर तुम्हालाही या समस्यांना वारंवार तोंड द्यावे लागत असेल, तर आहारामध्ये थोडा फार बदल करण्याची आवश्यकता आहे असे समजण्यास हरकत नाही. जर बद्धकोष्ठाचा त्रास होत असेल, तर आपल्या आहारामध्ये मुख्यत्वे फायबरची मात्रा जास्त असलेल्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. याच अंतर्गत आणि सध्याच्या थंडीच्या मोसमामध्ये सर्वांना नक्कीच आवडेल अश्या मूग आणि पालक सूपचा समावेश आहारामध्ये करता येईल. हे सूप पचण्यास कठीण नसून, यामध्ये शरीरासाठी आवश्यक सर्व पोषक तत्वे आहेतच, त्याच्याच जोडीने पचनासाठी आवश्यक फायबरही या सूपच्या द्वारे शरीराला मिळू शकते.
soup1
हे सूप बनविण्यासाठी एक कप हिरवे मूग पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालून ठेवावेत. दुसऱ्या दिवशी सकाळी मूग पाण्यातून उपसून स्वच्छ धुवून घ्यावेत आणि प्रेशर कुकरमध्ये मऊ शिजवून घ्यावेत. एका भांड्यामध्ये थोडेसे तेल किंव साजूक तूप घालून त्यामध्ये एक चिरलेला कांदा, पालकाची पाने (दीड कप), थोडे आले, लसूणाच्या पाच सहा पाकळ्या, हळद, आणि पाव चमचा कुटून घेतलेले धणे घालवेत. त्यानंतर यामध्ये आवडत असल्यास गाजराचे तुकडे, फ्लॉवरचे तुकडे, आणि थोडासा पुदिना घालून चांगले परतावे. भाज्या चांगल्या शिजल्या की शिजवून घेतलेले मूग यामध्ये घालून चांगले परतावेत. त्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण थंड होऊ द्यावे. मिश्रण थंड झाल्यानंतर थोडेसे पाणी घालून हे मिश्रण मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे, व चाळणीतून किंवा मोठ्या गाळणीतून गाळून घेऊन भाज्यांचा चोथा वेगळा करावा. गाळून घेतलेल्या मिश्रणामध्ये आवश्यक तेवढे पाणी घालून चवीपुरते मीठ आणि काळ्या मिऱ्याची पूड घालावी. सूपला चांगली उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा.
soup2
मूग आणि पालक यांमध्ये फायबरची मात्र जास्त असून, मूगामध्ये पोटॅशियम देखील मुबलक प्रमाणात असते. पालकामध्ये ही जीवनसत्वे, फायबर आणि लोह यांची मात्रा मुबलक असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment