या आहेत लद्दाखच्या ‘कुंग फु नन्स’

nuns
‘कुंग फु’ हा मार्शल आर्ट्सचा प्रकार म्हटला, की या मार्शल आर्टचे रीतसर प्रशिक्षण घेणारे आणि नियमित सराव करणारे बौद्ध भिक्षु डोळ्यांसमोर उभे राहतात. बौद्ध भिक्षुंनी कुंग फुचे प्रशिक्षण घेण्याची परंपरा गेल्या अनेक शतकांपासून चालत आली आहे. मात्र ही परंपरा केवळ भिक्षुंच्या पुरतीच मर्यादित असे. या परंपरेमध्ये २००८ सालापसून बदल घडवून आणला, बौद्ध धर्मगुरू ग्याल्वांग दृप्का यांनी. कुंग फु या मार्शल आर्टचे प्रशिक्षण केवळ भिक्षुंना मिळावे ही परंपरा मोडून काढीत, दृप्का यांनी हे प्रशिक्षण भिक्षुणींना ही दिले जाण्याचा आग्रह धरला.
nuns1
या प्रशिक्षणाद्वारे भिक्षुणींनी स्वावलंबी बनून स्वतःचे रक्षण करण्याची जबाबदारी स्वतः घ्यावी असा या मागील हेतू असल्याचे दृप्का म्हणतात. लद्दाखच्या सुंदर पर्वतराजीमध्ये असलेल्या बौद्ध धर्मशाळांमध्ये राहणाऱ्या, दृप्का बौद्ध समाजाच्या चारशे भिक्षुणी, आता कुंग फुचे प्रशिक्षण घेत असताना पहावयास मिळत आहेत. या प्रशिक्षणामुळे या भिक्षुणींचे शारीरिक बळ आणि आत्मविश्वास वाढले आहेतच, पण त्यासोबत हे प्रशिक्षण घेण्यासाठी करावी लागणारी मेहनत आणि त्यासठी पाळावे लागणारे कडक नियम यांमुळे या भिक्षुणींचे जीवन अधिक सुसंघटित बनले आहे.
nuns2
नव्याने कुंग फुचे प्रशिक्षण घेऊन यामध्ये पारंगत झालेल्या या भिक्षुणी आता त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने लहान असलेल्या भिक्षुणींना या मार्शल आर्टचे प्रशिक्षण देत आहेत. या नव्या उपक्रमाअंतर्गत दर वर्षी सुमारे शंभर भिक्षुणींना कुंग फुचे प्रशिक्षण दिले जात असते. याशिवाय पर्यावरणाच्या सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी या भिक्षुणी ठिकठीकाणी सायकल यात्रा देखील करीत असतात. नेपाळ मध्ये झालेल्या भूकंपानंतर नागरिकांच्या पुनर्वसनाच्या कामी देखील, दोनशे घरे बांधून या भिक्षुणींनी मोलाचे योगदान दिले आहे.

Leave a Comment