थंडीच्या मोसमाशिवायही वाजते थंडी? जाणून घेऊ या यामागची कारणे

cold
थंडीच्या मोसमामध्ये थंडी वाजणे ही बाब सामान्य असली, तरी हवामान थंड नसतानाही जर वारंवार थंडी वाजत असेल, अंगावर काही तरी उबदार पांघरण्याची आवश्यकता भासत असेल, तर त्यामागे काही निश्चित कारणे असू शकतात. शरीरामध्ये घडत असणाऱ्या सर्व प्रक्रिया योग्यप्रकारे सुरु राहाव्यात यासाठी शरीराचे तापमान योग्य असणे आवश्यक असते. आपण अन्नाच्या द्वारे सेवन करीत असलेल्या कॅलरीज पैकी सुमारे चाळीस टक्के कॅलरीज शरीराचे तापमान योग्य ठेवण्यासाठी खर्च होत असतात. त्यामुळे थंडीच्या मोसमाव्यतिरिक्त इतर वेळीही जर थंडी वाजत असेल, तर शरीराचे तापमान (core temperature) योग्य नसल्याचे ते लक्षण आहे. या मागे अनेक कारणे आहेत.
cold1
लोह शरीरासाठी अतिशय महत्वाचे तत्व आहे. या तत्वाच्या मदतीने शरीरातील सर्व अवयवांमध्ये रक्ताभिसरण सुरळीत राहते. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल, तर शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत अपुरा रक्तपुरवठा होण्याची शक्यता असते. याच कारणामुळे त्या व्यक्तीला सतत थंडी वाजू लागते. लोहाच्या कमतरतेमुळे थायरॉईड ग्रंथीचे कार्य विस्कळीत होऊन, शरीराला आवश्यक ती उष्णता मिळू शकत नाही. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये थायरॉइड हार्मोनची पातळी असंतुलित असेल, त्यांनाही सतत थंडी वाजत राहते.
cold2
‘रेनॉडस् फेनॉमेनन’ नामक काहीसा दुर्मिळ विकार ही सतत थंडी वाजण्याला कारणीभूत ठरू शकतो. या विकारामध्ये हातांमध्ये असणाऱ्या कोशिका अतिशय संवेदनशील असून, थंड तापमान सहन करु शकत नाहीत. थंड तापमानाच्या संपर्कामध्ये आल्यानंतर रक्ताभिसरण विस्कळीत होऊन त्वरीत हातांची बोटे निळसर पडू लागतात. अश्या वेळी बोटांमध्ये वेदना देखील जाणवू लागते. ही परिस्थिती केव्हाही उद्भवू शकते. ही अवस्था सरून हातांची बोटे पूर्वपदाला येण्यासाठी कधी पाच मिनिटांचा अवधी लागतो, तर कधी एका तासाचा अवधी देखील लागू शकतो. त्यानंतर बोटांमध्ये रक्ताभिसरण सामान्यपणे सुरु होते.
cold3
सतत मानसिक तणावाचा सामना करावा लागत असल्याने, झोप अशांत आणि अपुरी असल्याने शरीराची चयापचय शक्ती संतुलित राहत नाही. त्यामुळे शरीराचे तापमानही संतुलित राहू शकत नसल्याने सतत थंडी वाजल्याची भावना होत असते. त्याचबरोबर शरीरामध्ये पाण्याची कमतरता असल्यास ही थंडी वाजू शकते. शरीरामध्ये पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास, म्हणजेच डीहायड्रेशन झाल्यास, त्वचेकडे जाणारा रक्तपुरवठा शरीर आपोआपच नियंत्रित करते. अश्या वेळी सर्व रक्तपुरवठा महत्वाच्या अवयवांकडे वळविला जातो. त्यामुळे थंडी वाजल्याची भावना होते. यासाठी आपल्या वजनाच्या अनुसार पाणी पिणे आवश्यक आहे. (दर वीस किलो वजनामागे एक लिटर).

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment