असा आहे भयावह इतिहास ‘पलाझो डारियो’चा

Palazzo-Dario
अनेक देशांमध्ये अनेक नामांकित वास्तू आहेत. यांमधील अनेक वास्तू इतिहासातील अनेक चांगल्या घटनांची साक्ष देत आजही दिमाखात उभ्या आहेत, तर काही वास्तूंनी केवळ अनेक वाईट प्रसंगच पाहिले असल्याने कालांतराने या वास्तू शापित म्हणून ओळखल्या गेल्या आहेत. अनेक शतकांपासून उभ्या असलेल्या या वास्तूंशी निगडित इतिहास भयावह आहे. अश्या या वास्तू आजच्या काळामध्ये एकाकी, ओसाड पडल्या आहेत. अशीच एक भव्य वास्तू इटलीतील व्हेनिस शहरामध्ये उभी आहे. या वास्तूला ‘पलाझो डारियो’ या नावाने ओळखले जाते. जो कोणी ह्या वास्तूमध्ये राहिला, किंवा ज्याने ही वास्तू खरेदी केली, त्याचा संपूर्ण नायनाट झाला असल्याने ही वास्तू शापित समजली गेली आहे.
Palazzo-Dario3
पाचशे वर्षांपूर्वी बांधाविली गेलेली ही वास्तू ‘का डारियो’ या नावाने देखील ओळखली जाते. या वास्तूमध्ये राहिलेल्या अनेक लोकांचा संपूर्ण नायनाट झाला. काही अतिशय श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्तींचा देखील यात समावेश होता. य वास्तूमध्ये जो कोणी वीस दिवसांपेक्षा अधिक काळ राहिला, त्याचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे संपूर्ण नायनाट झाला. या वास्तूमध्ये राहिल्यानंतर कोणी प्राणाला मुकले, तर कोणाचे पूर्ण दिवाळे निघाले. या वास्तूशी निगडित घटना इतक्या विचित्र आहेत, की या घटना घडून गेल्यापासून या वास्तूला ‘जीवे मारणारी शापित वास्तू’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. आता स्थानिक लोक देखील या ठिकाणी येण्याचे धाडस क्वचितच करतात.
Palazzo-Dario1
शाही सरदार असणारे जियोवानी डारियो यांच्याकरिता ही वास्तू १४७९ साली बांधविण्यात आली. डारियोनंतर त्याची मुलगी मारीएता आणि त्याचा जावई विन्सेन्झो यांना ही वास्तू वारसहक्काने मिळाली. पण काही काळाने विन्सेन्झोचा याच वास्तूमध्ये खून करण्यात आला आणि त्याच्या अवघ्या काही दिवसानंतर मारीयेताचे शव जवळच असलेल्या कालव्यानजीक मिळाले. थोड्याच काळानंतर या दामाप्त्याचा मुलगा विन्सेन्झो ज्युनियर याचाही क्रेट शहरामध्ये खून करण्यात आला. त्यांनतर ही वास्तू ब्रिटीश शास्त्रज्ञ रॅडन ब्राऊन यांनी खरेदी केली खरी, पण या वास्तूमध्ये राहावयास आल्यानंतर थोड्याच काळामध्ये ब्राऊन यांना मोठ्या आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले. त्यातच ते समलैंगिक असल्याचे उघड झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले. इतक्या सर्व अडचणींना तोंड देण्याचे धाडस संपुष्टात आल्याने ब्राऊन यांनी त्यांच्या जोडीदारासमवेत याच वास्तूमध्ये आत्महत्या केली.

त्यानंतर ही वास्तू खरेदी केली अमेरिकन अब्जाधीश चार्ल्स ब्रिग्ज यांनी. पण ही वास्तू त्यांनाही लाभली नाही. त्यांचा ही अंत ब्राऊन यांच्याप्रमाणेच दु:खी आणि भयावह होता. मग मात्र ही वास्तू विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत रिकामीच पडून होती. १९६४ साली सुप्रसिद्ध ऑपेरा गायक मारियो डेल मोनॅको यांनी ही वास्तू खरेदी करण्यासाठी व्यवहार सुरु केले असता, हा व्यवहार पूर्ण होण्याआधीच त्यांच्या गाडीला जबर अपघात झाला. या वास्तूशी निगडित घटना मारियो यांना ठाऊक असल्याने, हा खरेदीच्या व्यवहार पूर्ण करण्यासाठी निघालेल्या मारियो यांच्या गाडीला झालेला अपघात, हा धोक्याचा इशारा असल्याचे समजून मारियो यांनी ही खरेदी त्वरित रद्द करण्याचा निर्णय घेतला.
Palazzo-Dario2
१९७० च्या दशकात ट्युरीनचे ‘काऊंट’ फिलिपो जियोर्डानो डेल लांझ यांनी पलाझो डारियो खरेदी केले. पण फिलिपो यांच्या जोडीदाराने त्यांची याच वास्तूमध्ये हत्या केली, आणि त्यानंतर काही काळाने या जोडीदाराचा देखील लंडनमध्ये अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर ‘द हू’ (the who) नामक लोकप्रिय रॉक बँडचे व्यवस्थापक असलेल्या किम लँबर्ट यांनी ही वास्तू खरेदी केली, पण इथे नकारात्मक शक्तींचा प्रभाव असल्याचे सांगून किम नेहमी एखाद्या हॉटेलमधेच वास्तव्य करीत असत. १९८०च्या दशकामध्ये सुप्रसिद्ध व्यावसायिक फाब्रीझियो फेरारी यांनी ही वास्तू खरेदी केली. येथे ते त्यांची बहिण निकोलेटा हिच्या सोबत राहत असत. पण फेरारी यांना आर्थिक संकटांमुळे सर्व संपत्ती गमवावी लागली, तर त्यांच्या बहिणीचा अपघाती मृत्यू झाला. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला सुप्रसिद्ध अभिनेते वूडी अॅलन यांचा, ही वास्तू खरेदी करण्याचा मानस होता, मात्र या वास्तूशी निगडित अनेक विचित्र घटना कानी आल्यामुळे त्यांनी हा विचार बदलला. या वास्तूचे निर्माण एका दफनभूमीवर करविले गले असल्याने ही वास्तू शापित असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment