काश्मीरची तथाकथित कुप्रसिद्ध राणी दिद्दा खरेच होती का क्रूर?

queen
काश्मीर राज्याचा प्राचीन इतिहास बहुचर्चित नसला, तरी या राज्यामध्येही एके काळी अनेक बलशाली राज्यकर्ते होऊन गेले. यांपैकी राजा ललितादित्य आणि त्यांनी उभारलेल्या भव्य राज्याचा इतिहास सर्वश्रुत असला, तरी काश्मीर राज्यामध्ये इतरही अनेक राज्यकर्ते होऊन गेले, ज्यांचा उल्लेख अभावानेच सापडतो. अश्या राज्यकर्त्यांपैकी एक होती, काश्मीरची राणी दिद्दा. अतिशय कपटी, कारस्थानी आणि क्रूर म्हणून राणी दिद्दाचा उल्लेख इतिहासामध्ये केला जातो. ही राणी इतकी दुष्ट होती, की राज्याची संपूर्ण सत्ता आपल्याच हाती राहावी यासाठी तिने आपल्या नातवंडांना देखील यमसदनी धाडल्याचे म्हटले जाते. आजच्या काळातील काश्मीर राज्य ९७९ ते १००३ सालापर्यंत राणी दिद्दाच्या अधिपत्याखाली होते. अशी ही राणी दिद्दा नक्की होती तरी कोण? आणि ज्याप्रमाणे इतिहासामध्ये तिचा उल्लेख अतिशय क्रूर, कपटी असा केला गेला आहे, तशी ती खरच होती का?
queen1
बाराव्या शतकामध्ये काल्हाना नामक इतिहासकार होऊन गेले. यांनी करून ठेवलेल्या नोंदींमुळे काश्मीर राज्याचा प्राचीन इतिहास लोकांपर्यंत पोहोचू शकला. काश्मीरमध्ये एकेकाळी सत्ता असणाऱ्या राज्यकर्त्यांचा उल्लेख काल्हाना यांनी आपल्या ‘राजतरंगिणी’ या ग्रंथामध्ये केला आहे. या ग्रंथामध्ये केवळ काश्मीरमध्ये होऊन गेलेल्या राजांचाच नाही, तर तत्कालीन बलशाली राण्यांचा देखील उल्लेख आहे. उदाहरणच द्यायचे झाले, तर या ग्रंथामध्ये राणी अमृतप्रभाचा उल्लेख आहे. सहाव्या शतकामध्ये होऊन गेलेली ही राणी आसाम राज्याची राजकन्या असून, तिच्या अधिपत्याखाली काश्मीरमध्ये अनके सुदर मंदिरे आणि विहार उभारले गेले. तसेच गोपालवर्मन यांच्या प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार पहात असलेल्या राणी सुगंधा यांचा ही उल्लेख या ग्रंथामध्ये आहे. मात्र या ग्रंथामध्ये प्रामुख्याने उल्लेख आढळतो तो राणी दिद्दाचा.

काल्हानाने आपल्या ग्रंथामध्ये राणी दिद्दाचे वर्णन, अतिशय क्रूर, आणि सत्तेसाठी काय वाटेल ते करण्यासाठी तयार असलेली अतिशय स्वार्थी राणी, असे केले आहे. मात्र काल्हाना यांचा ‘राजतरंगिणी’, राणी दिद्दाच्या मृत्युनंतर सुमारे १४५ वर्षांच्या नंतर लिहिला गेला असल्यामुळे या ग्रंथामध्ये राणी दिद्दाचे केले गेलेले वर्णन कितपत अचूक आहे, हा प्रश्न आपोआपच उभा राहतो. किंवा, केवळ राणी दिद्दा अतिशय स्वाभिमानी आणि करारी राणी असून, तत्कलीन पुरुषप्रधान समाजामध्ये, बलशाली पुरुषांनाही टक्कर देऊ शकतील अश्या स्त्रियांचे फारसे कौतुक होत नसे, म्हणून काल्हानाने राणी दिद्दाचे वर्णन नकारात्मक केले आहे का, हाही विचार करण्याजोगा मुद्दा आहे. काल्हानाने आपल्या ग्रंथामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे राणी दिद्दा ‘लोहार’ वंशाचे राज्यकर्ते सिंहराजा यांची कन्या होती. दिद्दा अतिशय सुन्दर असली, तरी अपंग होती. तिला चालता येत नसल्यामुळे तिला उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जात असे.
queen2
दिद्दा २६ वर्षांची झाल्यानंतर तिचा विवाह क्षेमगुप्त राजाशी झाला. त्याकाळी क्षमेगुप्तचे पिता पर्वगुप्त यांचे काश्मीर प्रांतावर आधिपत्य होते. वडिलांच्या मृत्युनंतर क्षेमगुप्त यांना सत्ता मिळाली खरी, पण ही सत्ता चालविण्याइतकी दूरदृष्टी आणि कौशल्य त्यांच्या अंगी नव्हते. त्यामुळे राज्याची जबाबदारी अर्थातच दिद्दाने पेलली. राज्यकारभारामध्ये प्रत्येक निर्णय दिद्दाच्या म्हणण्यानुसार होऊ लागला. क्षेमगुप्तावर दिद्दाचा जबरदस्त प्रभाव असल्यामुळे त्यांनी ही तिचा हस्तक्षेप मान्य केला. क्षेमगुप्ताच्या निधनानंतर तत्कालीन प्रथेनुसार सती न जाता, दिद्दाने तिचा पुत्र अभिमन्यूची प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार हाती घेतला. तेव्हाचा काळ पृरूषप्रधान संस्कृतीचा असल्याने स्त्रियांना राज्यकारभारामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसे. म्हणूनच जेव्हा दिद्दाने राज्यकारभार हाती घेतला तेव्हा तिला इतर सत्ताधारी राजांचा आणि खुद्द तिच्या दरबारातील मंत्र्याचा व सरदारांचा रोष पत्करावा लागला.

राणी दिद्दाच्या विरोधामध्ये अनेक बंड पुकारली गेली, पण दिद्दाने तिला सिंहासनावरून हटविण्याचे हे सर्व प्रयत्न हाणून पाडले. ९७२ साली दिद्दाचा पुत्र अभिमन्यू याच्या मृत्युनंतर दिद्दाने तिचा नातू भीमगुप्त याची प्रतिनिधी म्हणून राज्यकारभार आपल्या हाती ठेवला. एव्हाना दिद्दाने तिच्या विरोधामध्ये उभे असणाऱ्या अनेक सरदारांना आणि मंत्र्यांना देखील यमसदनी धाडले असल्याने, अतिशय क्रूर आणि कपटी राणी म्हणून ती ओळखली जाऊ लागली होती. पण वास्तविक, तत्कालीन इतर ऐतिहासिक ग्रंथांमधील उल्लेख पाहता राणी दिद्दा ही अतिशय उत्तम आणि कुशल राज्यकर्ती असून, तिच्या अधिपत्याखाली तिचे राज्य अतिशय समृद्ध आणि बलशाली बनले होते. तिच्या अधिपत्याखाली अतिशय भव्य आणि सुंदर अशी ६४ मंदिरे बांधली गेली. आताच्या काळामधील श्रीनगर मध्ये एके काळी अस्तित्वात असलेले भव्य शिवमंदिर ‘दिद्दारा मठ’ म्हणून ओळखले जात असे. आजच्या काळामध्ये हे मंदिर अस्तित्वात नसले, तरी ते एके काळी जिथे उभे होते, त्या परिसराला आजही ‘दिद्दामार’ म्हणून ओळखले जाते.
queen3
मात्र काल्हानाच्या ‘राजतरंगिणी’मध्ये दिद्दाची नकारात्मक बाजू समोर येते. त्यानुसार राणी दिद्दाला सत्तेची इतकी हाव सुटली, की सत्ता आपल्या हातून जाऊ नये यासाठी तिने आपल्या तीन नातवंडांची हत्या करविली असल्याचा उल्लेख या ग्रंथामध्ये आढळतो. तसेच दिद्दाचे तुंग नामक एका मेंढपाळावर प्रेम असून, कोणाचीही तमा न बाळगता, आपल्या दरबारातील गुणी मंत्र्यांना डावलून राणीने तुंगाला मुख्यमंत्री बनविल्याचा उल्लेखही आढळतो. राणी दिद्दाचा मृत्यू वयाच्या ७९व्य वर्षी १००३ साली झाला. त्यानंतर सर्व सत्ता तिचे बंधू उदयराजा यांच्या हाती आली.

Leave a Comment