ओळख भारतातील पारंपारिक चित्रकलेच्या निरनिरळ्या रूपांची

painting
भारतातील प्रत्येक पारंपारिक चित्राकृती स्वतःची वेगळी ओळख सांगणारी आहे. भारताच्या उत्तरेपासून ते सुदूर दक्षिणे पर्यंत आढळणारी भारताची पारंपारिक चित्रकला ही भारतातील प्रत्येक राज्याच्या परंपरांची आणि संस्कृतीची, रीती-रिवाजांची ओळख करून देणारी आहे. बिहार राज्य ओळखले जाते ते येथील पारंपारिक ‘मधुबनी’ चित्रकलेमुळे. ही चित्रकला, नैसर्गिक रित्या तयार केलेल्या रंगांपासून (dye) केली जाते. मात्र आजकाल अनेकविध रंग वापरून ही चित्रकला केली जाते. या चित्रकलेचे नमुने आपल्याला रेशमी साड्या, दुपट्टे, किंवा पेंटींग्जच्या रूपात पहावयास मिळत असतात. अनेक आकर्षक रंगांनी नटलेल्या या चित्रामध्ये बहुधा पौराणिक कथा चितारलेल्या पहावयास मिळतात.
painting1
मोठमोठे, भव्य किल्ले, विशाल वाळवंट म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर येतो राजस्थान. येथे कपड्यावर चितारलेल्या पारंपारिक चित्रकलेला ‘फड’ नावाने ओळखले जाते. एका मोठ्या चित्रामध्ये अनेक पौराणिक कथा किंवा लोककथा या प्रकारच्या चित्रकलेमध्ये पहावयास मिळतात. ‘पिछवाई पेंटींग्ज’ ही द्खील राजस्थानची खासियत असून, ही चित्रकला नाथद्वारा मंदिरामध्ये सुरु झाली असल्याचे म्हटले जाते. हे चित्रकला भगवान कृष्णाला समर्पित असून, या पद्धतीच्या बहुतेक चित्रांमध्ये कृष्ण आणि कृष्णाशी निगडित प्रसंग पहावयास मिळतात.
painting2
ओरिसा राज्याची खासियत आहे, ‘पट्टचित्र’ ही पारंपारिक चित्रकला. भूर्जपत्रावर ही चित्रकला पहावयास मिळत असून या चित्रांमध्ये अतिशय सुंदर रंगसंगती पहावयास मिळते. पश्चिम बंगालची पारंपारिक ‘कालीघाट’ ही चित्रकला कोलकाता येथील काली मंदिराची खासियत असून, यामध्ये गडद रंगांचा वापर अधिक पहावयास मिळतो. भारतातील अनेक आदिवासी जमातींच्या पारंपारिक चित्रकला आता नावारूपाला आल्या असून, या कला देखील भारतातील प्रमुख पारंपारिक चित्रकलांमधील एक म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. अतिशय साधी पण मोहक, दैनंदिन आयुष्यातील प्रसंग चितारलेली वारली पेंटींग्ज, महाराष्ट्रातील आदिवासी जमातीची पारंपारिक चित्रकला असून, भारतातच नव्हे तर जगभरामध्ये खूपच लोकप्रिय आहेत.
painting3
भारतामध्ये आलेल्या परकीय सत्तांच्या संस्कृतीचे प्रभावही भारतीय पारंपारिक चित्रकलेवर पहावयास मिळत असतात. आंध्र प्रदेशची खासियत असलेल्या ‘कलमकारी’वर पर्शियन संस्कृतीचा निश्चित प्रभाव पहावयास मिळतो. ही चित्रकला आताच्या काळामध्ये केवळ भूर्जपत्रावर किंवा पेंटींग्जच्या स्वरूपातच नाही, तर साड्या, दुपट्टे, बेडशीट्स, किंवा वॉलपेपरच्या रूपातही पहावयास मिळत आहे.

Leave a Comment