इंग्रजी रहस्यकथा म्हटल्या की अगाथा क्रिस्टी यांचे नाव प्रामुख्याने समोर येते. अनेक रहस्यकथा, थरारकथांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या अगाथा क्रिस्टी लंडनमधील चेल्सी परीससरातील एका प्रशस्त अपार्टमेंट मधे रहात असत. या ठिकाणी अगथाचे वास्तव्य तब्बल अठ्ठावीस वर्षे होते. येथे राहत असतानाचा त्यांच्या अनेक गाजलेल्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या. तसेच ‘माऊसट्रॅप’ नामक अतिशय लोकप्रिय झालेल्या नाटकाचे लेखन देखील अगाथा यांनी या अपार्टमेंटमधील वास्तव्यादरम्यानच केले. या ठिकाणी १९४८ सालापसून, त्यांचे निधन होईपर्यंत म्हणजे १९७६ सालापार्यंत अगाथा, त्यांचे पती सर मॅक्स मॅलोवन यांच्या समवेत राहत होत्या.
अगाथा क्रिस्टी यांच्या मालकीचे आणखी एक भव्य घर डेव्हॉन भागातही असून, या ठिकाणी अगाथा यांनी त्यांच्या ‘मिस मार्पल’ सिरीजच्या अनेक रहस्यकथा लिहिल्या होत्या. अगाथा यांची लंडनमधील अपार्टमेंट स्वान कोर्ट येथील ‘आर्ट डेको मॅन्शन ब्लॉक’ मध्ये असून, या इमारतीच्या तळमजल्यावरील अपार्टमेंटमध्ये अगाथा यांचे वास्तव्य होते. ही अपार्टमेंट अतिशय प्रशस्त असून, यामध्ये एक स्वागत कक्ष, एक मोठे स्वयंपाकघर, प्रशस्त बैठकीची खोली आणि मोठा शयनकक्ष आहे. अतिशय सुंदर फर्निचर आणि रंगसंगतीने या अपार्टमेंटची सजावट करण्यात आली आहे.
सध्या ही घर विक्रीसाठी किंवा भाडे-करारावर घेण्यासाठी उपलब्ध असून, ही अपार्टमेंट अतिशय मोक्याच्या ठिकाणी असल्याचे समजते. तसेच होतकरू लेखक मंडळींना, जगप्रसिद्ध लेखिकेच्या घरामध्ये राहण्याची संधी मिळाल्यानंतर लेखनासाठी त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल असे, या अपार्टमेंटचा ताबा असलेल्या इस्टेट एजन्सीचे म्हणणे आहे. पास्टर रियल इस्टेट ही एजन्सी सध्या या अपार्टमेंटशी निगडित सर्व व्यवहार पाहत असून, या अपार्टमेंटची किंमत ९५०,००० पाउंड्स, म्हणजेच सुमारे १,२२४,००० डॉलर्स इतकी ठरविण्यात आली आहे.