कीटकनाशकांपासून होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी वैज्ञानिकांनी तयार केले नवे मलम

gel
शेतकरी तऱ्हे-तऱ्हेच्या किडीपासून पिकांचा बचाव करण्यासाठी पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करीत असतात. या कीटकनाशकांमुळे पिकांचा बचाव होत असला, तरी ही फवारणी करताना या रासायनिक कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतात. फवारणी करीत असताना कीटकनाशके अंगावर उडून, त्वचेशी निगडीत अनेक समस्यांनाही शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागते. याचा समस्यांचे निवारण करण्यासाठी वैज्ञानिकांनी आता एक नवे ‘gel’, म्हणजेच मलम तयार केले आहे.
gel1
बेंगळूरू येथील ‘इंस्टीट्युट फॉर स्टेम सेल बायोलॉजी’ या संस्थेतील तेरा वैज्ञानिकांच्या टीमने हे मलम तयार केले असून, हे ‘पॉली ऑक्झाईम’ जेल आहे. लॉब्स्टर्स, क्रॅब्ज यांसारख्या सागरी जीवांच्या कवचांचा वापर करून हे जेल तयार करण्यात आले आहे. हे जेल तयार करण्याच्या कामाला २०१५ साली सुरुवात केली गेली असून, भारतातील शेतकऱ्यांसाठी हे जेल विशेष फायद्याचे ठरणार आहे. भारतामध्ये ‘ऑर्गनोफॉस्फेट’ बेस्ड कीटकनाशकांचा वापर जास्त प्रमाणामध्ये केला जात असतो. या कीटकनाशकांचा वापर करून उद्भविलेल्या दुष्परिणामांच्या पायी गेल्या काही काळामध्ये अनेक शेतकऱ्यांना गंभीर त्वचाविकारांना तोंड द्यावे लागले आहे.
gel2
सध्या या जेलचे यशस्वी परीक्षण प्राण्यांवर केले जात असून, याच्या वापराने कीटकनाशकांचे दुष्परिणाम त्वचेवर होत नसल्याचे आढळून आले आहे. कीटकनाशकांची फवारणी करताना मास्क, हातमोजे, किंवा त्वचेला संरक्षण देतील असे कपडे शेतकरी क्वचितच वापरत असल्याने त्यांना अनेक त्वचारोगांना सामोरे जावे लागते. तसेच या कीटकनाशकांचे ‘concentration’ जास्त असल्याने त्वचेच्या मार्फत शरीरामध्ये शिरुन अनेक आजारांना आमंत्रण ठरीत असल्याचे दिसून येते. त्वचेवर कीटकनाशक प्रतिरोधक जेलचा वापर केल्याने कीटकनाशकांमधील घातक रसायने त्वचेच्या वाटे शरीरामध्ये प्रवेश करण्याला आळा बसणार असल्याने या जेलच्या वापराने शेतकऱ्यांना पुष्कळ लाभ होणार असल्याचे वैज्ञानिक म्हणतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment