जगातील काही मोठ्या शहरांना अशी मिळाली त्यांची टोपणनावे

city
‘द बिग स्मोक’, ‘द सिटी ऑफ लव्ह’ आणि ‘द बिग अॅपल’, ही जगातील काही नामांकित शहरांना मिळालेली टोपणनवे आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का? ‘द बिग स्मोक’ हे लंडन शहराला मिळालेले टोपणनाव असून, पॅरिस हे शहर ‘द सिटी ऑफ लव्ह’ म्हणून ओळखले जाते. तसेच अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराला ‘द बिग अॅपल’ हे टोपणनाव मिळालेले आहे. या शहरांना ही टोपणनावे मिळण्यामागे काही खास इतिहास आहे. आणि केवळ याच शहरांना नाही, तर जगातील अनेक नामांकित शहरांना अशीच टोपणनावे मिळालेली आहेत. या शहरांना त्यांची टोपणनावे नेमकी कशी मिळाली ही जाणून घेऊ या.
लंडन शहराला ‘द बिग स्मोक’या नावाने ही ओळखले जाते. एकोणिसाव्या शतकामध्ये आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये लंडनमध्ये राहणारे लोक थंडीच्या दिवसांमध्ये घरे आतून ऊबदार राहवीत या करिता शेकोट्यांमध्ये कोळसा पेटवून ठेवीत असत. परिणामी या शेकोट्यांमधून धूर मोठ्या प्रमाणात निघत असे. घरामधून हा धूर बाहेर पडावा या करिता घराच्या शेकोट्यांच्यावर, छतापाशी मोठमोठ्या चिमण्या असत. या चिमण्यांमधून धूर बाहेर पडत असे. हा धूर इतक्या मोठ्या प्रमाणावर वातावरणात दाटत असे, की सदैव दाट धुके पडल्याचा भास होई. याच धुराला ‘लंडन फॉग’ किंवा ‘पी सूपर्स’ या नावाने ओळखले जात असे. या धुरामुळे लंडनला ‘द बिग स्मोक’ हे टोपणनाव देण्यात आले होते.

टोरोन्टो शहराला ‘द मडी यॉर्क’ या टोपणनावाने ओळखले जात असे. पूर्वीच्या काळी या शहरामध्ये सर्वत्र मातीचे कच्चे रस्ते असत. पावसाळ्यामध्ये या रस्त्यांवर पाणी साचून सर्वत्र चिखल होत असे. त्या कारणास्तव या शहराला ‘द मडी यॉर्क’ म्हणून संबोधले जात असे. स्वित्झर्लंड देशाची राजधानी ‘द पीस कॅपिटल’ म्हणून ओळली जाते. स्वित्झर्लंड हा शांतताप्रिय देश म्हणून ओळखला जात असून, राजकीय दृष्ट्या हा देश नेहमीच तटस्थ राहिला आहे. राजधानी जेनेव्हा येथे दोनशे आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्यालये असून, आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणत्याही राजकीय मतभेदांमध्ये हा देश कधीच अडकलेला नाही. म्हणूनच जेनेव्हाला ‘द पीस कॅपिटल’ म्हटले जाते.

इटली देशातील दुसऱ्या क्रमांकावर असणारे मोठे शहर मिलॅन असून, या शहराला ‘द फॅशन कॅपिटल’ म्हटले जाते. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक मोठे फॅशन शो सातत्याने आयोजित होत असून, मोठमोठे आंतरराष्ट्रीय ब्रँडस् या ठिकाणी पहावयास मिळत असतात. सिडनी हे केवळ ऑस्ट्रेलिया देशातील सर्वात मोठे शहरच नाही, तर जगातील सर्वात मोठ्या नैसर्गिक बंदरांपैकी एक असलेले ‘पोर्ट जॅक्सन’ या ठिकाणी असल्याने सिडनीला ‘द हार्बर सिटी’ या नावानेही ओळखले जाते. सिडनी शहराचे प्रमुख आकर्षण असलेले हार्बर ब्रिज आणि सिडनी ऑपेरा हाऊस, पोर्ट जॅक्सन येथे आहेत. बीजिंग शहराला ‘द फोरबिडन सिटी’ म्हटले जाते. या शहरामध्ये चीनी शाही परिवाराचे निवासस्थान असून, १३६८ सालापासून १९११ सालापर्यंत ‘मिंग’ आणि ‘क्विंग’ वंशाचे राज्यकर्ते या ठिकाणी रहात असत. म्हणून त्या काळी या शहरामध्ये परवानगी शिवाय येण्यास सामान्य जनतेला बंदी असून, केवळ शाही परिवाराचे सदस्य, त्यांचे पाहुणे आणि राजदरबारी असलेल्या अधिकाऱ्यांना येथे येण्याची परवानगी असे.

न्यूयॉर्क शहराला ‘द बिग अॅपल’ का म्हटले जाते, हे सांगणाऱ्या अनेक आख्यायिका आहेत. पण त्यांपैकी सर्वमान्य आख्यायिका अशी, की तत्कालीन न्यूयॉर्क शहरामध्ये घोड्यांच्या शर्यती अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय असत. जिंकणाऱ्या घोड्यांना रसदार सफरचंदे बक्षीस म्हणून आली जात असत. म्हणूनच या शहराला ‘द बिग अॅपल’ हे नाव पडल्याचे म्हटले जाते. रोम शहराला ‘द इटर्नल सिटी’ म्हटले जाते. प्राचीन काळापासून रोमन संस्कृतीमध्ये ही मान्यता रूढ होती, की जगामध्ये कितीही नव्या सत्ता, संस्कृती, शहरे उदयाला आली आणि अस्ताला गेली तरी रोमन संस्कृती आणि रोम शहर कायम अस्तित्वात राहील. म्हणूनच हे शहर ‘इटर्नल’ म्हणजेच सदैव अस्तित्वात राहणारे म्हटले गेले आहे. लास व्हेगसचे नाव येताच डोळ्यांसमोर उभे राहतात भव्य कॅसिनो, पाण्यासारखे वाहणारे मद्य, आणि रात्रीचा अंधार भव्य रोषणाईने उजळून टाकणारे नाईट क्लब्स. म्हणूनच या शहराला ‘द सिन सिटी’ म्हटले जाते. त्याचप्रमाणे पॅरिस हे शहर प्रेमाचे प्रतीक मानले जात असून, या शहराला ‘द सिटी ऑफ लव्ह’ या नावाने देखील ओळखले जाते.

Leave a Comment