कहाणी ग्वालियरच्या गुप्त खजिन्याची

Treasure
कोणी कल्पनाही करु शकणार नाही असा भरघोस खजिना, अतिशय संशयी महाराजा, जमिनीखाली दडलेली गुप्त भुयारे, भारतातील एक सुप्रसिद्ध, भव्य किल्ला आणि या खजिन्याशी निगडित अनेक कागदपत्रांचा शोध, या सर्व गोष्टी एखाद्या चित्रपटाच्या कथानाकासारख्या भासत असल्या, तरी या काल्पनिक मात्र नाहीत. या खजिन्याच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर हा खजिना वास्तविक ग्वालियरच्या सिंदिया घराण्याच्या मालकीचा. सिंदिया पेशव्यांचे सरदार असून, ग्वालियर संस्थान सिंदियांच्या अधिपत्याखाली होते. त्या काळी मध्य भारताचा अधिकतम भाग महादजी शिंद्याच्या अधिपत्याखाली असे. महादाजींचे नातू जयाजीराव यांनी १८४३ साली ग्वालियरचा राज्यकारभार आपल्या हाती घेतला.
Treasure1
जयाजीरावांचा स्वभाव काहीसा विचित्र होता. सिंदिया घराण्याच्या मालकीची संपत्ती जयाजीराव ग्वालियर किल्ल्याच्या गुप्त भुयारांमध्ये दडवून ठेवीत असून, या सर्व संपत्तीचा ठाव ठिकाणा केवळ त्यांना माहित असे. त्या बाबतीत इतर कोणावरही त्यांचा विश्वास नसे. १८५७ साली जेव्हा बंड झाले, तेव्हा राणी लक्ष्मीबाई आणि तात्या टोपे यांनी काही काळापुरते ग्वालियर आपल्या ताब्यात घेतले तेव्हा जयाजीरावांना ग्वालियरचा किल्ला सोडून पलायन करावे लागले होते. पण त्या काळामध्येही ग्वालियरचा खजिना इतक्या हुशारीने दडविला गेला असल्यामुळे किल्ला इतरांच्या ताब्यामध्ये असूनही हा खजिना कोणाच्याही हाती लागू शकला नाही. १८५७ सालचे बंड इंग्रजांनी मोडून काढल्यानंतर ग्वालियरचा किल्ला इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर १८८६ साली हा किल्ला पुन्हा एकदा जयाजीरावांच्या ताब्यात आला.
Treasure3
पण हा किल्ला पुन्हा ताब्यात येईपर्यंत जयाजीरावांचा जीव टांगणीला का लागून होता याचे कारण स्पष्ट होते. इतका मोठा खजिना किल्ल्यामध्ये लपविला असताना, तो कोणाच्या हाती लागेल कि काय या भीतीने जयाजी रावांना घेरले होते. त्यांच्या मनाची घालमेल जेम्स फोर्ब्स मिचेल नामक एका ब्रिटीश सैन्य अधिकाऱ्याने ‘द हिडन ट्रेझर ऑफ इंडिया’ या लेखामध्ये व्यक्त केली आहे. ग्वालियरचा किल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी जयाजीराव उतावळे का झाले होते याचे खरे कारण, लाला मथुरा प्रसाद नामक एका गडगंज व्यावसायिकाने जेम्स फोर्ब्स यांना सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार जयाजीरावांनी त्या काळी किल्ल्यामध्ये सहा कोटी रुपयांची संपत्ती दडविली होती. तसेच ही संपत्ती कुठे दडविली गेली आहे हे फक्त जयाजीरावांना ठाऊक असल्यामुळे ते हयात असेपर्यंत किल्ला त्याच्या ताब्यात येणे आवश्यक होते. किल्ला ताब्यात आल्यानंतर अनेक गवंड्यांना किल्ल्यामध्ये पाचारण केले गेले. तसेच आपण कुठे काम करणार आहोत याची माहिती उघड न करण्याबद्दल त्यांच्याकडून वचने घेण्यात येऊन खजिना दडवून ठेवलेली भुयारे पुन्हा उघडण्याचे काम सुरु झाले.
Treasure4
मात्र हे काम पूर्ण होऊन खजिना हाती येण्याआधीच जयाजीराव यांचे निधन झाल्याने या किल्ल्यामध्ये दडवून ठेवलेल्या खजिन्याचे रहस्य त्यांच्याबरोबरच लुप्त झाले. जयाजीरावांच्या नंतर महाराजा माधोराव सिंदिया (पहिले) यांनी राज्यकारभार सांभाळला. काही काळानंतर एक म्हातारा इसम माधोरावांकडे आला, आणि आपले डोळे बांधले, तर खजिना लपविलेले भुयार नेमके आहे त्या ठिकाणी आपण घेऊन जाऊ शकू असे सांगू लागला. त्याचे बोलणे मान्य करून माधो रावांनी त्याचे डोळे बांधले आणि तो जिथे नेईल इथे त्याच्या मागून जाऊ लागले. किल्ल्याच्या भुयारांमध्ये आत आत जाऊ लागताना, हा आपल्याला मारायचा कट तर नाही असे वाटून महाराजांनी त्या म्हाताऱ्या माणसालाच मारून टाकले. तेथून माघारी फिरल्यानंतर अंधारामध्ये महाराजंचा हात योगायोगाने एका खांबाला लागला आणि तो खांब जागचा हलून त्यामागे दडलेले भुयार समोर आले.
Treasure2
या भुयारामध्ये खजिन्याची माहिती देणारी अनेक कागदपत्रे सापडली. हा सर्व खजिना अनमोल रत्ने, सोने, चांदीची नाणी, या स्वरूपात असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले. तसेच हा खजिना भुयारांमध्ये कुठे कुठे लपविला आहे याची ही माहिती या कागदपत्रांमध्ये सापडली. त्यावरून हा खजिना केवळ किल्ल्यातच नाही, तर ग्वालियरमध्ये अनेक ठिकाणी दडविला गेला असल्याची माहिती उघड झाली. त्यांनतर हा खजिना अर्थातच त्याकाळी भारतावर आधिपत्य असणाऱ्या ब्रिटीशांच्या ताब्यात गेला.

Leave a Comment