हे मसाले भोजनामध्ये वापरून पाहिलेत का?

spice
मसाले, हे आपल्या भोजनाचे अविभाज्य अंग आहेत. आपल्या भोजनाला रंगत आणि रुची देणारे असे हे मसाले आपल्या घरामध्ये अगदी दररोजच्या साध्या भोजनाची देखील चव वाढवितात. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये असंख्य मसाले निरनिरळ्या रूपांमध्ये वापरले जात असतात. कधी दळून पूड केलेले, कधी इतर मसाल्यांच्या सोबतीने कुटून घेऊन, कधी अख्खे मसाले, नुसतेच भाजून घेऊन, तर कधी भिजवून वाटून घेऊन हे मसाले भोजनामध्ये वापरले जात असतात. रोजच्या वापरात असलेले जिरे, मोहोरी, दालचिनी, लवंगा, वेलदोडे, धणे, मिरे, इत्यादी मसाले आपल्या परीचयाचे असले, तरी आपल्या खाद्यसंस्कृतीमध्ये असेही अनेक मसाले आहेत, जे आपल्या फारशा परिचयाचे नाहीत, मात्र हे वापरले असता, आपल्या भोजनाचा स्वाद द्विगुणीत होईल हे मात्र नक्की.
spice1
गरमागरम नान किंवा पराठ्यावर पसरलेल्या काळ्या तिळासारख्या दिसणाऱ्या बिया कोणत्या हा प्रश्न तुम्हाला पडला का? या बियांना ‘कलोन्जी’ म्हटले जाते. या बिया काहीशा कडू-गोड चवीच्या असतात. या बिया औषधी असून, मसाला म्हणूनही यांचा वापर केला जात असतो. उत्तर भारतामध्ये या बियांचा वापर लोणच्यांमध्ये होतो. तसेच बंगाली खाद्य परंपरेमध्ये कलोन्जी, ‘पंचफोडण’, म्हणजे फोडणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाच मसाल्यांच्या पदार्थांपैकी एक आहे. ‘भूत जोलोकिया’, किंवा ‘नागा मिरची’ ला गिनीस वर्ल्ड रेकॉर्ड्सतर्फे जगातील सर्वात तिखट मिरची म्हणून ओळखली गेली आहे. लालबुंद अशी ही मिरची पूर्वोत्तर राज्यांतील खाद्यसंस्कृतीतील काही खास पदार्थ बनविण्यासाठी वापरली जाते. या मिरचीचा अगदी लहानसा तुकडा जरी एखाद्या पदार्थामध्ये वापरला गेला तरी हा पदार्थ अगदी झणझणीत बनत असतो.
spice2
ओव्याप्रमाने दिसणारा ‘राधुनी’ हा मसाल्याचा पदार्थ दक्षिण आशियातील प्रांतांमध्ये प्रामुख्याने आढळतो. राधुनीचा वास काहीसा कोथिंबीरीसारखा असून, त्याची चव ‘सेलेरी’ प्रमाणे लागते. बंगाली पदार्थामध्ये हा मसाला वापरला जात असतो. ‘लाकाडोंग हळद’ ही खास मेघालयमध्ये होणारी हळद असून, जगातील सर्वोत्तम प्रतींच्या हळदीपैकी ही एक आहे. ही हळद औषधी आहे. मेघालयची आणखी एक खासियत म्हणजे ‘जैउर’. काळ्या मिरीप्रमाणे दिसणाऱ्या या मसाल्याला ‘शेझवान पेपर’ किंवा तेजफळ या नावाने देखील ओळखले जाते. एखाद्या पदार्थामध्ये वापरला जाण्यापूर्वी हे मिरे थोडेसे भाजून घेऊन, मग कुटून घेऊन वापरले जातात.

Leave a Comment