फेंगशुईच्या दृष्टिने शुभ असलेल्या वस्तूंचे उपयोग नेमके काय?

feng
घरे तयार करताना आणि घराची सजावट करताना त्यामागील वास्तूशास्त्र नेहमीच लक्षात घेतले जाते. घराची रचना वास्तूशास्त्राच्या सल्ल्यानुसार केली गेली असतानाच, घरामध्ये कुठल्या वस्तू, कश्याप्रकारे, कुठे ठेवल्या जाव्यात या मागेही काही नियम आहेत. याच बाबतीत फेंगशुईची मदतही घेतली जात असते. फेंगशुईचा संबंध चीनी वास्तूशास्त्राशी असून, हे शास्त्र जल आणि वायू या दोन तत्वांवर आधारित असल्याचे म्हटले जाते. भारतीय वास्तूशास्त्रामध्ये ज्याप्रकारे घरातील नकारत्मक उर्जा दूर करून, सकारात्मक उर्जेची चालना घरामध्ये व्हावी या करिता अनेक उपाय सांगितले गेले आहेत, त्याचप्रमाणे फेंगशुईमध्ये ही घरातील नकारात्मक उर्जा आणि त्या घरातील व्यक्तींच्या बाबतीत कोणत्याही कारणाने येणारे अपयश दूर करण्याचे उपाय सांगितले गेले आहेत.
feng1
घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ फेंगशुईची तीन नाणी टांगून ठेवण्याची पद्धत चीनी वास्तूशास्त्रामध्ये रूढ आहे. अश्या प्रकराची नाणी घराच्या प्रवेशद्वारावर टांगल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येऊन भरपूर धनप्राप्ती होत असल्याचे म्हटले जाते. ही तीन नाणी लाल रंगाच्या रिबनमध्ये बांधून दरवाज्याच्या जवळ टांगण्याची पद्धत आहे. मात्र ही नाणी घराच्या प्रवेशद्वाराच्या जवळ, पण घराच्या आतमध्ये टांगलेली असतील याची काळजी घ्यावी. घराच्या बाहेर ही नाणी टांगली जाऊ नयेत. या नाण्यांच्या प्रमाणेच छोटे बांबूचे झाड घरामध्ये असणे ही फेंगशुईच्या नुसार अतिशय शुभ मानले गेले आहे. या झाडामुळे घरामध्ये समृद्धी नांदत असून, हे झाड जितके वाढेल तितकी यशप्राप्ती आणि प्रगती होत असल्याचे फेंगशुई म्हणते.
feng2
चीनी वास्तूशास्त्रामध्ये तीन पाय असलेल्या बेडकाची प्रतिकृती लक्ष्मीचे, म्हणजेच धनाचे प्रतीक मानली गेली आहे. चीनमधील पारंपारिक पद्धतीने बनविलेल्या घरांच्या प्रवेशद्वारापाशी तीन पाय असलेल्या बेडकांच्या आकृती बनविलेल्या पहावयास मिळतात. फेंगशुईमध्ये बेडूक या प्राण्याला खास महत्व आहे. म्हणूनच तीन पाय असलेल्या आणि तोंडामध्ये नाणे असलेल्या बेडकाची प्रतिकृती घराच्या बाहेर ठेवलेली पहावयास मिळते. तसेच फेंगशुईमध्ये विंड चाइम्सचे देखील मोठे महत्व आहे. एका दोरीवर लहान लहान घंटा टांगून बनविलेले हे विंड चाइम्स दाराजवळ किंवा खिडकीजवळ टांगलेले दिसतात. या घंटांच्या निनादाने नकारात्मक शक्ती वास्तूपासून दूर राहत असून, वास्तूमध्ये सकारात्मक उर्जा सक्रीय होत असल्याचे म्हटले जाते.
feng3
फेंगशुईनुसार घरामध्ये मासे ठेवल्यास त्यामुळे सौभाग्यात वृद्धी होते. त्यामुळे घरामध्ये लहान मासे असलेले अॅक्वेरीयम घराच्या दिवाणखान्यामध्ये पूर्वेला किंवा दक्षिण-पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले गेले आहे. फेंगशुईनुसार या अॅक्वेरीयममध्ये नऊ गोल्डफिश असावेत. या नऊ गोल्डफिश पैकी आठ सोनेरी तर एक मासा काळ्या रंगाचा असणे शुभ मानले गेले आहे.

Leave a Comment