राजधानी दिल्लीमध्ये कधी काही कारणाने जाणे झाले, तर वीकेंडला खरेदीचा बेत अवश्य आखावा. मनसोक्त खरेदी करता येईल, आणि विशेषतः महिलांना त्यांच्या पसंतीच्या वस्तू खरेदी करता येतील अशी काही खास, खिश्याला सहज परवडतील अशी मार्केट्स राजधानी दिल्लीमध्ये आहेत. या मार्केट्सबद्दल जाणून घेऊ या. या सर्वच मार्केट्समध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तू आजच्या फॅशन ट्रेंड्स बरहुकुम असून, या मार्केट्समध्ये महाविद्यालयीन तरुण-तरुणींची आणि महिलांची विशेष गर्दी नेहमीच पहायला मिळते. इतर शहरांमधून दिल्लीमध्ये काही कामानिमित्ताने किंवा सुट्टीसाठी आलेली मंडळी आणि परदेशी पाहुणेही या मार्केट्सना अवश्य भेट देत असतात. या मार्केटस् मध्ये मिळणाऱ्या सर्वच वस्तू रास्त भावांना उपलब्ध असून, या चांगल्या प्रतीच्या असतात.
‘दिल्ली हाट’, दिल्लीतील ‘आयएनए’ मार्केटच्या जवळ असणारे मार्केट आहे. या ठिकाणी अनेक राज्यांच्या खासियती असणाऱ्या वस्तू तुम्हाला पहावयास मिळतील. या ठिकाणी अनेक तऱ्हेचे कपडे, साड्या, रंगेबिरंगी बांगड्या, फॅशन ज्वेलरी, चादरी, गालिचे, फर्निचर, पेंटींग्ज, इत्यादी वस्तू तुम्हाला पहावयास मिळतील. या वस्तूंचे भाव रास्त असून, या ठिकाणी ‘बार्गेनिंग’, किंवा योग्य भावासाठी घासाघीस करण्याची भरपूर संधी असते. दिल्लीतील प्रसिद्ध ‘जनपथ’ मार्केट राजीव चौकाच्या जवळ आहे. या ठिकाणी खरेदी करण्यासाठी परदेशी पर्यटकांची गर्दी जास्त पहावयास मिळते. याही ठिकाणी तऱ्हेतऱ्हेचे पारंपारिक आणि पाश्चात्य कपडे, फॅशन ज्वेलरी, हँडीक्राफ्ट, पर्सेस इत्यादी वस्तू उपलब्ध आहेत.
दिल्लीमधील खान मार्केट या ठिकाणी अनेक ब्रँडस् ची आउटलेट्स असून, येथे स्ट्रीट मार्केटही आहे. तऱ्हेतऱ्हेच्या फॅशनेबल कपड्यांच्या व्यतिरिक्त हे मार्केट आयुर्वेदिक औषधांच्या करिताही प्रसिद्ध आहे. येथे कपडे, पुस्तके आणि सौंदर्यप्रसाधनेही उपलब्ध आहेत. दिल्लीतील प्रसिद्ध ‘चांदनी चौक’ हा मोठा कपडाबाजार आहे. लग्नसमारंभ किंवा तत्सम खास प्रसंगांसाठी आवश्यक साड्या, भरजरी लेहंगा, पंजाबी सूट इत्यादी पेहराव या मार्केटची खासियत आहेत. अतिशय रास्त भावावर उत्तम प्रतीचे, हर तऱ्हेचे पारंपारिक कपडे येथे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर फुटवेअर, फॅशन ज्वेलरीही या मार्केटमध्ये उपलब्ध असते.
लाजपत नगर आणि सरोजिनी नगर या दोन्ही मार्केट्स मध्ये पारंपारिक आणि पाश्चात्य कपडे, फुटवेअर, ज्वेलरी, पर्सेस, इत्यादी वस्तू खरेदी केल्या जाऊ शकतात. थंडीच्या दिवसांमध्ये या मार्केट्समध्ये उत्तम प्रतीचे स्वेटर, शाली, रास्त भावांना उपलब्ध असतात. तसेच अनेक गृहोपयोगी वस्तूही या मार्केट्स मध्ये खरेदी करता येतात. करोल बाग या ठिकाणी असलेले ‘टिप टॉप’ मार्केट उत्तम प्रतीच्या गृहोपयोगी वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी क्रोकरी, शोभेच्या वस्तू, पेंटींग्ज इत्यादी वस्तूंची खूप विविधता पहावयास मिळते.