सांधेदुखी सतावत असल्यास आजमावा हे घरगुती उपाय

joint
सांधेदुखी हा विकार आजच्या काळामध्ये केवळ वयस्क लोकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. आजकालच्या काळामध्ये तरुण लोकांमध्येही हा विकार दिसून येण्याचे प्रमाण वाढताना पहावयास मिळत आहे. व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा, पोषक आहाराचा अभाव अश्या जीवनशैलीमुळे सांधेदुखी जास्त आढळून येऊ लागली आहे. सांधेदुखीसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतली जाणारी अनेक औषधे किंवा मलमे, तेले, बाजारामध्ये सहज उपलब्ध आहेत. त्याच्या जोडीने सांधेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपायांचा देखील अवलंब करता येऊ शकेल.
joint1
ज्यांना सांधेदुखीचा त्रास वारंवार सतावत असेल, त्यांनी आहारामध्ये ब्रोकोली समाविष्ट करावी. फ्लॉवर सारखी दिसणारी, हिरव्या रंगाची ही भाजी आता सर्वत्र सहज उपलब्ध होऊ लागली आहे. या भाजीमधे असलेली अनेक पोषक तत्वे शरीराच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. ब्रिटन येथील युनिव्हर्सिटी ऑफ इस्ट अँजेलीया येथे कार्यरत असणाऱ्या वैज्ञानिकांनी केलेल्या रिसर्चच्या अनुसार ब्रोकोलीमध्ये आढळणारी तत्वे सांधेदुखी कमी करण्यासाठी सहायक आहेत. यामध्ये असलेली कॅल्शियम, प्रथिने, लोह, अ आणि क जीवनसत्वे, क्रोमियम, इत्यादी तत्वे शरीराचे आरोग्य उत्तम ठेवणारी आहेत.
joint2
सांधेदुखीचा त्रास असणाऱ्यांनी आपल्या दररोजच्या आहारामध्ये लसूण जरूर समाविष्ट करावा. लसूणामध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल आणि अँटी इन्फ्लेमेटरी तत्वे आहेत. यामुळे सांध्यांवर आलेली सूज कमी होऊन सांधेदुखी पासून आराम मिळतो. लसूणाप्रमाणेच चंदनबटवा ही पालेभाजी देखील सांधेदुखीचा त्रास कमी करणारी आहे. ही पालेभाजी शिजवून खाल्ल्याने किंवा या भाजीच्या पानांचा रस नियमित तीन महिने प्यायल्याने सांधेदुखी कमी होण्यास मदत होते. मात्र हा रस बनविताना यामध्ये मीठ किंवा इतर कोणत्याही वस्तू घालू नयेत. हळदीमध्ये असलेले कुर्क्युमीन नामक तत्व जीवाणूप्रतिरोधक आहे. तसेच शरीरावर कुठेही येणारी सूज कमी करून वेदना नाहीसे करणारे हे तत्व आहे. त्यामुळे आहारामध्ये हळदीचा समावेश ही अवश्य करायला हवा. ओमेगा थ्री फॅटी अॅसिड्स सांधेदुखी कमी करण्यासाठी उपयुक्त असल्याने ही तत्वे असलेले पदार्थ आहारामध्ये समाविष्ट करावेत. यामध्ये मासे, अळशीच्या बिया, सुका मेवा इत्यादींचा समावेश आहे.
joint3
सांधेदुखी सतावत असली, तरी थोड्या प्रमाणात का होईना पण नियमित व्यायामासाठी वेळ देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आपल्या आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे असून, जास्त मीठ असलेले, तेलकट, प्रोसेस्ड अन्नपदार्थही शक्यतो टाळले जावेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment