घटस्फोट झाल्यानंतर प्रिन्सेस डायनाला करावा लागला होता या गोष्टींचा त्याग.

diana
जनमानसाच्या हृदयांमध्ये घर करून राहिलेली, अनेक समाजकल्याणकारी कार्यांसाठी पुढाकार घेणारी ब्रिटीश राजवंशाची स्नुषा, प्रिन्स चार्ल्स यांची सौंदर्यवती पत्नी प्रिन्सेस डायना, हिने १९९६ साली झालेल्या तिच्या घटस्फोटानंतर स्वतःला समाजकल्याणकारी कार्यांमध्ये संपूर्णपणे गुंतवून घेतले. ब्रिटीश राजघराण्याची स्नुषा असताना ज्या कामांमध्ये तिला रुची असूनही वेळ देता येणे शक्य नव्हते, त्यासाठी तिने आपले आयुष्य खर्ची घालण्याचा निर्णय घेतला. मनोरुग्ण आणि एड्स सारख्या दुर्धर रोगांनी पीडित व्यक्तींना दिलासा देणाऱ्या डायनाला घटस्फोटानंतरचे तिचे स्वातंत्र्य अनुभवत असतानाच आता व्यक्तिगत पातळीवर देखील स्वातंत्र्य अनुभवण्यास मिळत होते.
diana1
या बहुचर्चित घटस्फोटानंतर डायनाला तिचे स्वातंत्र्य मिळाले असले, तरी राजघराण्याशी संपुष्टात आलेल्या संबंधांमुळे तिला बरेच काही गमवावेही लागले. सर्वप्रथम तिला तिचे ‘हर रॉयल हायनेस’ हे संबोधन गमवावे लागले. हे संबोधन राजघराण्याच्या सदस्यांसाठी असून, डायनाला ‘हर रॉयल हायनेस’ म्हणून संबोधले जाण्यावर तिचे पती प्रिन्स चार्ल्स यांनी आक्षेप घेतल्याने हे संबोधन डायनाला गमवावे लागले. घटस्फोटानंतर तिला ‘डायना-प्रिन्सेस ऑफ वेल्स’ म्हणून संबोधले जाऊ लागले.
diana2
राजघराण्याच्या सदस्यांना राजकीय दौऱ्यांवर जाण्यासाठी ठराविक निधी दिला जात असून, इतर आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असतात. पण घटस्फोट झाल्यानंतर डायनाला या अनेक सोयी नाकारण्यात येऊन, कामांनिमित्त परदेशी प्रवास करण्यापूर्वी तिला विदेश मंत्रालयाकडून परवानगी घेण्याची सक्ती करण्यात आली होती. तसेच सेंट जेम्स पॅलेस येथे असलेले डायनाचे खासगी कार्यालय बदलून ते केन्सिंग्टन पॅलेस या तिच्या खासगी निवासस्थान असलेल्या संकुलामध्ये हलविण्यात आले. त्याचबरोबर डायनासाठी एके काळी कार्यरत असलेला कर्मचारीवर्ग जाऊन त्याऐवजी केवळ तीन कर्मचारी तिच्या दिमतीला देण्यात आले.
diana3
डायना राजघराण्याची स्नुषा असल्याने तिला कायम पोलीस संरक्षण दिले जात असे, मात्र घटस्फोट झाल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमांव्यतिरिक्त हे पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले. तसेच आधीच्या काळामध्ये शंभराहून अधिक धर्मादाय संस्थांमध्ये राजघराण्याची सदस्या म्हणून कार्यरत असलेल्या डायनाकडून या जबाबदाऱ्या देखील काढून घेण्यात आल्या. घटस्फोट झाल्यानंतर अवघ्या एक वर्षाच्या कालावधी नंतर प्रिन्सेस डायना हिचा पॅरीसमध्ये अपघाती मृत्यू झाला.

Leave a Comment