आला ओमिक्रोनचा भाऊ- डोल्मीक्रोन
करोनाच्या महाभयंकर डेल्टा व्हेरीयंट चा उत्पात सुरु असतानाच ओमिक्रोनची एन्ट्री अनेक देशात झाली आहे आणि ओमिक्रोनचे चित्र अजून स्पष्ट होण्याअगोदरच ओमिक्रोनचा भाऊ दाखल झाला असल्याची बातमी आली आहे. या नव्या व्हेरीयंटचे नामकरण सध्या डोल्मीक्रोन असे केले गेले आहे. अमेरिका आणि युरोपीय देशातील स्थिती खराब होण्यामागे हे व्हेरीयंट असावे असा अंदाज संशोधक व्यक्त करत आहेत. या देशात सध्या असलेली करोना लाट डोल्मीक्रोन लाट असावी असा तर्क व्यक्त होत आहे.
गेले दोन वर्षे जगात हलकल्लोळ माजविलेल्या करोनाचे एक व्हेरीयंट पूर्ण जाण्याच्या अगोदरच नवीन व्हेरीयंट दाखल होत असल्याचे दिसून आले आहे. चीनच्या वूहान मध्ये करोनाचे पहिले व्हेरीयंट आले आणि त्यानंतर त्याची अनेक व्हेरीयंट येतच राहिली आहेत. करोनाच्या डेल्टा व्हेरीयंटने जगभर धुमाकुळ सुरूच ठेवला असतानाच नवे व्हेरीयंट ओमिक्रोन दाखल झाले आहे. जगात सध्या दोनच व्हेरीयंट आहेत. डेल्टा आणि ओमिक्रोन. त्यातील डेल्टा अनेक देशात अजूनही मोठ्या प्रमाणावर आहे. जेथे लसीचे दोन्ही डोस झाले आहेत तेथे बुस्टर डोसची मागणी वाढली असल्याचे दिसून आले आहे.
भारतात ओमिक्रोन संक्रमितांची संख्या २२० वर गेली आहे. महाराष्ट्र सरकारच्या करोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी या संदर्भात माहिती देताना म्हणाले, अमेरिका, युरोप मध्ये डोल्मीक्रोनची छोटी त्सुनामी आली आहे असे म्हणण्यास जागा आहे. भारतात त्याचा किती परिणाम होईल हे आत्ताच सांगता येणार नाही. देशात डेल्टा अजूनही मोठ्या प्रमाणावर आहे. जगाच्या अन्य देशात सुद्धा डेल्टाची जागा ओमिक्रोन घेत आहे. मात्र भारतात हायब्रीड इम्यूनिटी आहे. मुंबई, दिल्ली मधील सिरो सर्व्हे मध्ये सामील ९० टक्के लोकांना करोना झाला असे दिसून आले आहे. ८८ टक्के भारतीयांनी कोविड लसीचा पाहिला डोस घेतला आहे आणि पूर्ण लसीकरणावर जोर दिला जात आहे.