युरोप मध्ये करोनाच्या सावटाखाली सलग दुसरा नाताळ

करोनाच्या डेल्टा व्हेरीयंटच्या प्रभावातून युरोप अद्यापि सावरला नसतानाच करोनाच्या नव्या ओमिक्रोन व्हेरीयंटने युरोप आणि अमेरिकेत धुमाकूळ सुरु केला आहे. या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणारा मुख्य सण नाताळ तोंडावर आला आहे मात्र यंदाही करोनाची छाया या सणावर पडली आहे. सलग दुसऱ्या वर्षी हीच परिस्थिती राहिल्याने युरोपीय देशातील सरकार द्विधा मनस्थितीत आहेत असे समजते.

युरोपीय देशातील अर्थव्यवस्था नुकतीच थोडी रुळावर येऊ लागली आहे आणि जनजीवन सामान्य होऊ लागले असताना पुन्हा करोना ओमिक्रोनची दहशत फैलावली आहे. त्यामुळे देशात सक्त नियमावली लावली तर अर्थव्यवस्थेला पुन्हा खीळ बसणार आहे आणि नियमावली शिथिल ठेवावी तर ओमिक्रोन वेगाने पसरणार आहे. युरोप मधील देश या संदर्भात नक्की काय पावले टाकावीत याचा विचार करत आहेत. मात्र नेदरलंडने देशात कडक नियमावली लागू केली असून पूर्ण लॉकडाऊन घोषित केला आहे. युरोपात असा निर्णय घेणारा नेदरलंड पहिला देश आहे. फ्रांस, स्पेन, इटली सरकारने अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही मात्र बुस्टर डोस घेण्यावर जोर दिला आहे.

ओमिक्रोनचा सर्वाधिक फटका बसलेल्या ब्रिटन मध्ये तज्ञ आणि सल्लागार कडक लॉकडाऊन लावण्याचा सल्ला देत आहेत मात्र पंतप्रधान बोरिस जोन्सन यांनी सक्त लॉकडाऊन लावण्यास नकार दिला आहे. यावरून सरकारमध्येच वाद निर्माण झाला असल्याचे समजते. डेन्मार्क मध्ये थियेटर्स, हॉल, सार्वजनिक पार्क, प्राणीसंग्रहालये बंद केली गेली आहेत मात्र लसीकरण झाल्याने मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगवर प्रतिबंध नाहीत.

अमेरिकेत नाताळच्या सुट्ट्या सुरु झाल्या असल्या तरी ओमिक्रोनमुळे नागरिकांनी घरातच राहणे पसंत केल्याचे दिसत आहे. येथे रोज १ लाख नव्या करोना केसेस येत आहेत आणि त्यातील ७३ टक्के ओमिक्रोनच्या आहेत असे समजते. अध्यक्ष जो बायडेन यांनी लॉकडाऊनची घोषणा केलेली नाही मात्र लष्करातील डॉक्टर्स तैनात केले आहेत. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, टेक्सास, बोस्टन राज्यांनी कडक प्रतिबंध लागू केले आहेत.