दोन्ही डोस घेतलेल्या ९० टक्के भारतीयांना ओमिक्रॉनचा धोका?

सध्या कोविड १९चे संक्रमण रोखण्यासाठी जगात जेवढ्या लसी उपलब्ध आहेत त्या ओमिक्रॉनचे संक्रमण रोखण्यास सक्षम नाहीत असा अहवाल ब्रिटन मध्ये नुकत्याच केल्या गेलेल्या एका सर्व्हेक्षणात दिला गेला आहे. या प्राथमिक संशोधन अहवालात भारतात लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना सुद्धा ओमिक्रॉनचा धोका असल्याचे म्हटले गेले आहे. मात्र हा धोका गंभीर स्वरूपाचा नसेल तर संक्रमितात सामान्य लक्षणेच दिसतील असाही खुलासा केला गेला आहे.

या संशोधनानुसार ओमिक्रॉन संक्रमण रोखण्यास सध्याच्या लसीपैकी फायझर आणि मॉडर्ना या दोनच लसी उपयुक्त आहेत मात्र त्यांचाही बुस्टर डोस घेणे आवश्यक आहे. या दोन्ही लसी जगातील बहुतेक देशात उपलब्ध नाहीत. भारताबाबत केलेल्या अध्ययनात असे दिसले आहे की ऑक्सफर्ड अँस्ट्राजेनेकाची लस कोविशिल्ड नावाने भारतात उपलब्ध असून ९० टक्के भारतीयांनी हीच लस घेतली आहे. मात्र सहा महिन्यानंतर ही लस करोना संक्रमणापासून संरक्षण देण्यास फारशी प्रभावी राहत नाही. याच लसीचे साडे सहा कोटी डोस आफ्रिकन देशांना दिले गेले आहेत.

विशेष म्हणजे जोन्सन, रशियाची स्पुतनिक आणि चीनच्या लसी सुद्धा ओमिक्रॉन संक्रमण थोपविण्यास सक्षम नाहीत. ओमिक्रॉनची नवी लाट व्यापक स्वरुपाची असेल असे संकेत मिळत आहेत. त्यात जगातील अब्जावधी नागरीकानी कोणत्याच कोविड १९ लसीचा एकही डोस घेतलेला नाही. परिणामी डेल्टा आणि ओमिक्रॉन यातून नवे कोरोन व्हेरीयंट तयार होऊ शकेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.