हे बॉलीवूड सितारे घरभाड्यातूनही करतात लाखोची कमाई
बॉलीवूड कलाकारांची संपत्ती, मालमत्ता हा नेहमीच चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय असतो. त्यामुळे कुठल्या कलाकाराने नवे घर घेतले, कुणाची किती घरे आहेत, कोण अजून भाड्यावर घर घेऊन राहतो या संदर्भातल्या बातम्या नेहमीच आवडीने वाचल्या जातात. ज्या सेलेब्रीटीच्या अनेक मालमत्ता आहेत ते त्याचे काय करतात असाही प्रश्न अनेकांना पडतो. तर हे बॉलीवूड सेलेब्रिटी घरे भाड्याने देऊन त्यातून लाखोंची कमाई करतात असे सांगितले जाते. जणू हा त्यांचा साईड बिझिनेस असतो असेही म्हटले जाते.
बॉलीवूडमधले ज्येष्ठ, श्रेष्ठ कलाकार अमिताभ बच्चन यांनी काही महिन्यांपूर्वी एक अलिशान डुप्लेक्स खरेदी केल्याची बातमी आली होती. बिग बी यांनी हा अलिशान डुप्लेक्स नोव्हेंबरमध्ये कृती सेनन हिला दोन वर्षासाठी भाडे कराराने दिला असून त्यापोटी त्यांना दरमहा १० लाख रुपये भाडे मिळते. या डुप्लेक्स साठी कृतीने ६० लाख रुपये डीपॉझीट भरले आहे असेही समजते. काजोलने तिची पवई मधली ७७१ चौरस फुटाची सदनिका नुकतीच भाड्याने दिली असून त्यासाठी दरमहा ९० हजार रुपये भाडे घेतले जात आहे.
अभिषेक बच्चन यांने त्याचा जुहू येथील बंगल्याचा तळमजला १५ वर्षाच्या कराराने भाड्याने दिला असून त्याला दरमहा १८.९ लाख रुपये भाडे मिळते. सलमान खान त्याच्या कुटुंबासह बांद्रा येथे राहतो.त्यानेही त्याची बांद्रा येथील एक सदनिका भाड्याने दिली असून त्याला या जागेचे ८.२५ लाख रुपये भाडे दरमहा मिळते. अन्य एका सदनिकेसाठी सलमानला दरमहा ९० हजार रुपये भाडे मिळते. सैफ अली खान यानेही
बांद्रा येथील त्याची एक सदनिका दरमहा ३.५ लाख रूपये भाड्याने दिली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी यालाही त्याच्या बांद्रा मधील जागेचे दरमहा ५ लाख रुपये भाडे मिळते. करन जोहरने त्याच्या दोन व्यावसायिक मालमत्ता भाड्याने दिल्या असून त्यापोटी त्याला दरमहा १७.५ आणि ६.१५ लाख रुपये भाडे मिळते.