या दहा देशात अस्तित्वात नाही करोना

करोनाचे नवे व्हेरीयंट ओमिक्रॉन अतिशय वेगाने फैलावत आहे आणि आत्तापर्यंत ८९ देशात ते पोहोचले असल्याच्या बातम्या येत आहेत. मात्र जगात असेही काही देश आहेत जेथे करोना अस्तित्वातच नाही. जगात सध्याच्या घडीला असे १२ देश असून त्यातील १० द्विपीय देश आहेत आणि उरलेले दोन तानाशाही देश आहेत. या देशांनी करोना येताच त्यांच्या देशांच्या सीमा बंद केल्या होत्या आणि कडक नियमावली लागू केली होती असे सांगितले जाते. या देशांकडून करोनाच्या झिरो केसेसचा दावा केला जात असला तरी काही देशात पूर्वी करोनाच्या थोड्या केसेस आढळल्या होत्या असेही समजते.

विचित्र कायदेकानून असलेल्या उत्तर कोरियात करोनाची एकही केस नाही असे सांगितले जाते. तसेच तुर्कमेनिस्तान देशात सुद्धा करोनाची एकही केस नाही असा दावा केला जातो. मात्र या दोन्ही देशांनी त्यांचा हेल्थ डेटा जगाबरोबर कधीच शेअर केलेला नाही. तुर्कमेनीस्थान या मध्य आशियातील देशाच्या चारी बाजूनी असलेल्या देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे पण या देशाने सुरवातीपासूनच सक्त नियम लागू केले आणि प्रवासी लोकांसाठी देशाच्या सीमा सील केल्या त्यामुळे येथे करोना पोहोचला नाही असा दावा केला जात आहे.

तुवालू हा हवाई आणि ऑस्ट्रेलिया यांच्या मधला १० चौरस मैलाचा देश. त्याची लोकसंख्या १० हजार असून या देशाने नागरिकाना सुरवातीपासून विलगीकारणात ठेवले आणि देशाच्या सीमा बंद केल्या त्यामुळे येथेही करोना नाही. उत्तर कोरिया हा अडीच कोटी लोकवस्तीचा देश आहे. मात्र येथेही सक्त लॉकडाऊन, सीमा सील आणि प्रवास बंदी केली गेली आहे. न्यूझीलंड जवळच्या तोकेलाऊ हा देश न्यूझीलंडच्या मदतीवर अवलंबून आहे मात्र येथे विमानतळ नाही. समुद्र प्रवास करूनच जावे लागते. येथेही करोनाची एकही केस नोंदली गेलेली नाही.

द.अटलांटिक सागरातील सेंट हेलेना हे ब्रिटीश प्रवासी बेट असले तरी त्याचा वापर अमेरिकन हवाई दल करते. येथेही करोना नाही. ज्वालामुखीतून बनलेल्या बेटांचा समूह असलेल्या पिटकेर्न बेटावर कायमस्वरूपी फक्त ५० लोक राहतात. येथेही करोना नाही. न्यूझीलंड पासून २४०० किमीवर असलेल्या नियु या जगातील सर्वात मोठ्या प्रवाळ बेट देशाने न्यूझीलंड कडूनच करोना प्रतिबंधासाठी मदत घेतली असून येथेही करोना नाही.

जगातील छोट्या देशातील तीन नंबरचा देश नाउस. केवळ १० हजार वस्ती असलेल्या या देशात सुरवातीपासूनच प्रवास बंदी लागू केली गेली त्यामुळे येथे करोनाचा शिरकाव झाला नाही असे सांगतात. ३२ प्रवाळ बेटांचा समूह असेलेल्या किरीबाटी देशाने सुद्धा करोनाच्या आगमनापासून प्रवास बंदी लागू केली त्यामुळे येथे करोना पोहोचू शकला नाही. ६०० बेटांचा समूह असलेल्या माईक्रोनेशिया देशात करोना नाही असे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे.