कोणीही करत नाही या मंदिरामध्ये जाण्याचे धाडस

temple
सगळे उपाय थकले की देवाचा आसरा घ्यावा असे म्हणतात. म्हणूनच आपल्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात, आयुष्यामध्ये सुख समृद्धी यावी आणि मन:शांती लाभावी अशी प्रार्थना ईश्वराच्या चरणी अर्पण करण्यासाठी आपण मंदिरामध्ये जात असतो. या ठिकाणी गेल्यावर मनातील सारी भीती, सर्व दडपण नाहीसे होते. पण भारतामध्ये एक मंदिर असे ही आहे, जिथे जाण्याचे धाडस सर्वसामान्य मनुष्य करू धजत नाही. खरे तर मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक शक्ती प्रवेश करण्याचे धाडस करू शकत नाहीत, पण या मंदिराची ख्याती अशी आहे, ज्यामुळे नकारात्मक शक्तीच काय, तर भाविक देखील दर्शनाला येण्याचे धाडस करीत नाहीत.
temple1
हिमाचल प्रदेशातील चंबा प्रांतामध्ये भरमोर नामक लहानशा गावमध्ये हे मंदिर आहे. तसे हे मंदिर अगदी लहानसे असले, तरी या मंदिराची ख्याती मात्र सर्वत्र आहे. या मंदिरामध्ये भाविक दर्शनासाठी येतात खरे, पण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश न करता, मंदिराच्या बाहेरूनच देवाचे दर्शन घेतात. हे मंदिर मृत्यूचे देवता यमदेवाचे मंदिर आहे. यमदेवाला समर्पित मंदिरे भारतामध्ये फारशी नाहीतच. भरमोर येथील यम मंदिरामध्ये साक्षात यमदेवाचा वास असून, येथे प्रवेश करण्याची मुभा केवळ यमदेवांनाच असल्याची मान्यता येथे रूढ असल्याने या मंदिरामध्ये प्रवेश करण्याचे धाडस भाविक करीत नाहीत.
temple2
स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या मंदिरामध्ये चित्रगुप्तासाठी देखील एक लहानसा कक्ष बनविण्यात आला आहे. चित्रगुप्त जगातील सर्व मनुष्यांच्या चांगल्या-वाईट कर्मांचा हिशोब ठेवत असल्याची मान्यता रूढ आहे. ही कर्म लक्षात घेता मनुष्याला मृत्युच्या नंतर स्वर्ग प्राप्त होणार की तो नरकात जाणार हे ठरविण्याचा अधिकारही चित्रगुप्ताला आहे, अशी ही समजूत आहे.
temple3
भरमोरमधील यम मंदिरमध्ये चार दरवाजे असून, हे दरवाजे सोने, चांदी, तांबे आणि लोखंड या चार धातूंनी बनविण्यात आले असल्याचे म्हटले जाते. ज्या मनुष्यांनी आयुष्यभर वाईट कर्मे केली, त्यांच्या आत्म्याला मृत्युच्या पश्चात लोखंडी दरवाजातून परलोकात पाठविले जाते, तर ज्यांनी आयुष्यभर अनेक पुण्यकर्मे केली, त्यांचे आत्मे सोन्याच्या दरवाजातून परलोकामध्ये पाठविले जात असल्याची आख्यायिका येथे प्रसिद्ध आहे.

Leave a Comment