चिंच ही आपल्या खाद्य परंपरेमध्ये फार पूर्वीपासूनच वापरली जात आहे. आंबट गोड चवीचे हे फळ आमटी, सांबार आणि तत्सम पदार्थांमध्ये वापरले जात असते. चिंचेचा वापर केवळ पदार्थाची चव वाढविण्यासाठीच नाही, तर औषधी म्हणून देखील केला जात असतो. चिंचेच्या सेवनाने लिव्हर निरोगी राहण्यास मदत असून, ज्यांच्या लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी साठली असेल, (फॅटी लिव्हर), यांच्यासाठी हे फळ विशेष लाभकारी आहे. तसेच लिव्हरशी निगडीत इतर समस्या, कोलेस्टेरोलचे वाढलेले प्रमाण कमी करण्यासही चिंचेचे सेवन सहायक आहे.
चिंचेपासून बनविलेल्या काढ्यामुळे बद्धकोष्ठ, आणि पेप्टिक अल्सर सारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. केवळ चिंचेचे फळच नाही, तर चिंचेचा पाला आणि झाडाची सालही औषधी म्हणून वापरण्यात येते. चिंचेमध्ये असलेली पॉलिफेनोल्स उत्तम अँटी ऑक्सिडंटस् असून, त्यामुळे शरीरामध्ये जंतूंचा संसर्ग रोखण्यास मदत मिळते. यामध्ये असलेल्या क जीवनसत्वामुळे शरीरातील फ्री रडिकल्स नष्ट होण्यास मदत होते. चिंचेचे सेवन अन्नपचनास सहायक असून, नैसर्गिक रेचक म्हणून याचा वापर होतो.
चिंचेचा काढा बनविण्यासाठी दोन मुठी भरून पिकलेली, साले काढलेली चिंच घ्यावी. ही चिंच थोड्या पाण्यामध्ये घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावी. त्यानंतर हा चिंचेचा कोळ गाळून घेऊन एक लिटर पाण्यामध्ये मिसळावा आणि हे पाणी दहा मिनिटे उकळून घ्यावे. हे मिश्रण थंड झाल्यानंतर त्यामध्ये आवडत असल्यास मध घालावे किंवा आवडत असल्यास चवीला किंचित ब्राऊन शुगर किंवा गूळ घालावा. अश्या प्रकारे चिंचेचा काढा तयार करून ठेऊन दिवसातून दोन वेळा, सकाळी आणि संध्याकाळी थोडा थोडा प्यावा.
निरोगी लिव्हरसाठी आजमावा चिंचेचा काढा
Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही