तामिळनाडूचे लोकप्रिय स्ट्रीट फूड – कोथू परोटा

kothu
भारतामध्ये जितकी राज्ये, तितक्या निरनिराळ्या खाद्यसंस्कृती. प्रत्येक खाद्यसंस्कृतीची खासियत आगळी, पदार्थ वेगळे, ते बनविण्याची पद्धतही वेगळी. ही खाद्यसंस्कृती दैनंदिन भोजनाच्या रूपामध्ये, ते कधी खास प्रसंगाच्या निमित्ताने बनविल्या जाणाऱ्या काही खास पदार्थांच्या रूपामध्ये आपल्या भेटीला नेहमीच येत असते. याच खाद्य संस्कृतीचा आणखी एक अविभाज्य भाग म्हणजे ठीकठिकाणचे लोकप्रिय ‘स्ट्रीट फूड’. पारंपारिक भोजनाला, किंवा हॉटेलमधील पदार्थांच्या ऐवजी उपलब्ध असलेला हा अतिशय स्वस्त, मस्त आणि चविष्ट असा पर्याय आहे. महाराष्ट्राचा वडापाव, गुजरातमध्ये कच्छी दाबेली, राजधानी दिल्लीमधली ‘दही भल्ल्ले’, ‘छोले कुल्चे’ आणि अर्थातच ‘पापडी चाट’, राजस्थानची ‘राजकचोरी’ ही आणि अशीच अनेक स्ट्रीट फुड्स आता आपल्याही परिचयाची झाली आहेत.
kothu1
तमिळनाडू राज्यातील स्ट्रीट फूडबद्दल बोलायचे झाले, तर या ठिकाणी ‘कोथू परोटा’ हा पदार्थ अतिशय लोकप्रिय आहे. ‘कोथू परोटा’ याचा शब्दशः अर्थ कुस्करलेला परोटा असा आहे. हा पदार्थ बनविण्यासाठी अनेक पदर असलेला, नरम परोटा कुस्कारला जातो, आणि हा चुरा भल्या मोठ्या लोखंडी तव्यावर घातला जातो. त्यानंतर खाणाऱ्याच्या आवडीप्रमाणे अंडी, चिकन किंवा मटनचा खिमा यामध्ये मिसळला जातो. त्याच्या जोडीने काही मसाले, कांदे आणि टोमॅटो घालून हे मिश्रण गरम तव्यावर चांगले परतले जाते. हे मिश्रण लोखंडी उलथणी वापरून परतले जात असताना त्याचा सातत्याने होणारा विशिष्ट आवाजही परोटा खाणाऱ्याची भूक आणखी सचेत करणारा असतो.
kothu2
तमिळनाडूचे हे लोकप्रिय स्ट्रीट फूड वास्तविक मूळचे मदुराईचे. अगदी धावपळीत असताना देखील सहज उपलब्ध होणारे पूर्णान्न म्हणून हा पदार्थ आता सर्वत्र लोकप्रिय झाला आहे. तेव्हा तामिळनाडूमध्ये बहुतेक ठिकाणी सहज उपलब्ध असणारा हा पदार्थ संधी मिळेल तेव्हा अवश्य चाखून पाहावा.

Leave a Comment