घरच्या समारंभांच्या निमित्ताने असो, किंवा कामानिमित्त एखाद्या मिटींगमध्ये किंवा समारंभामध्ये असो, नवनवीन लोकांना भेटण्याचे प्रसंग आपल्यावर वारंवार येत असतात. अश्या वेळी आपण लोकांना आवडावे, आपल्या व्यक्तिमत्वाची उतम छाप इतरांवर पडावी असे प्रत्येकालाच वाटत असते. पण त्यासाठी केवळ चांगले दिसणे, उत्तम पेहराव परिधान करणे एवढेच पुरेसे नसून, तुमचे संभाषणचातुर्य, समोरच्या व्यक्तीशी बोलण्याची पद्धत, हावभाव, हे देखील तितकेच महत्वाचे असतात. यालाच सोशल एटीकेट म्हटले जाते.
‘सोशल एटीकेट’ – या सवयींनी लोकांना करून घ्या आपलेसे.
जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी संभाषण करीत असतो, तेव्हा आपले संपूर्ण लक्ष त्या व्यक्तीकडे असावे. त्या व्यक्तीच्या नजरेला नजर भिडवून (direct eye contact) संभाषण करणे आवश्यक आहे. जर संभाषण सुरु असताना तुम्ही सतत इतरत्र पहात असाल, तर संभाषणाकडे तुमचे लक्ष नसल्याचे, किंवा तुम्हाला संभाषणामध्ये रस नसल्याचे समोरच्या व्यक्तीच्या लगेच ध्यानी येईल, आणि ती व्यक्ती तुमच्याशी संभाषण टाळेल. त्यामुळे संभाषण करीत असताना समोरच्या व्यक्तीकडे पूर्ण लक्ष असावे. तसेच अनोळखी व्यक्ती समोर असली तरीही आपल्या चेहऱ्यावर हलके स्मितहास्य ठेवल्याने समोरच्या व्यक्तीच्या मनावर कोणत्याही प्रकारचे दडपण असल्यास ते कमी होते आणि संभाषण अधिक मोकळेपणाने होऊ शकते.
इतरांशी संभाषण करीत असताना वारंवार हातातील फोनवरील मेसेज पाहणे आवर्जून टाळावे. तसेच संभाषणाच्या मध्ये आवश्यक नसल्यास फोनवर बोलू नये. अतिशय जरुरी कॉल असल्यास समोरच्या व्यक्तीला तसे सांगून कॉल घेण्याची परवानगी मागावी. संभाषणाच्या मध्ये अकारण आलेला व्यत्यय संभाषणाचे महत्व कमी करणारा असतो. त्यामुळे संभाषणामध्ये सहभागी असताना त्यामध्ये अकारण व्यत्यय येईल असे काही करणे टाळावे. संभाषण करताना अधूनमधून समोरच्या व्यक्तीला नावाने संबोधावे. त्यामुळे त्या व्यक्तीकडे आपले संपूर्ण लक्ष असल्याचे दिसून येत असते. तसेच संभाषण करीत असताना केवळ स्वतःच बोलत न बसता इतरांना देखील बोलण्याची संधी द्यावी आणि इतर कोणी बोलत असताना त्याकडे पूर्ण लक्ष असावे.
आजकाल कोणाला भेटल्यानंतर हस्तांदोलन करणे ही सर्वमान्य पद्धत आहे. हस्तांदोलन करीत असताना समोरच्या व्यक्तीच्या हातावर आपल्या हाताची पकड फार ढिलीही असू नये आणि फार घट्ट ही असू नये. हस्तांदोलन करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ, आणि कोरडे असतील याची काळजी घ्यावी. जर थंडीमध्ये हातांमध्ये हातमोजे घातलेले असतील तर हस्तांदोलन करण्यापूर्वी हातमोजे काढलेले असावेत. तुमच्या हस्तांदोलन करण्याच्या पद्धतीवरूनही तुमच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज समोरच्या व्यक्तीला येत असतो. तसेच संभाषणाच्या दरम्यान तुम्ही खुर्चीवर कसे बसता किंवा कसे उभे राहता याकडे ही लक्ष असावे. खुर्चीवर बसला असाल, तर खांदे झुकवून बसणे, टेबलवरील वस्तूंशी बोटांनी चाळा करणे टाळावे. उभे राहून संभाषण करीत असल्यास उभे राहण्यासाठी खुर्ची किंवा भिंतीचा आधार न घेता ताठ उभे राहावे.
एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर त्याच्या पेहरावाविषयी किंवा अलीकडेच त्या व्यक्तीने केलेल्या एखाद्या कामाविषयी त्या व्यक्तीची प्रशंसा करावी. ज्याप्रमाणे ‘कॉम्प्लिमेंट’ देणे ही कला आहे, त्याचप्रमाणे आपल्याला मिळालेली कॉम्प्लिमेंट योग्यप्रकारे स्वीकारता येणे ही देखील कला आहे. जर समोरची व्यक्ती आपली प्रशंसा करीत असेल, तर त्याचा नम्रपणे स्वीकार केला जाणे आवश्यक आहे. आपल्या वागण्यावरून किंवा आपल्या बोलण्यावरून गर्विष्ठपणाची भावना प्रतीत होणार नाही याची काळजी घ्यावी.