हे तुरुंग घडवून आणत आहेत कैद्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन

jail
तुरुंग म्हटला, की चारी बाजूंनी सरळसोट उंच, उभ्या भिंती, कडेकोट पहारा आणि या चार भिंतींमध्ये घड्याळाच्या काट्याबरहुकुम चाललेले कैद्यांचे जीवन असे काहीसे दृश्य आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. हे कैदी त्यांनी केलेल्या गुन्ह्यांसाठी जरी शिक्षा भोगत असले, तरी त्यांना सुधारण्याच्या अनेकविध संधी आता कारागृहांमध्ये उपलब्ध करून दिल्या जात असतात. ब्राझील देशाचे निवासी असलेल्या आणि व्यवसायाने शिक्षक असलेल्या वाल्डेची फरेरा या व्यक्तीच्या कल्पनेतून आता येथील कारागृहांमधील कैद्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन येत आहे.
jail1
ही कल्पना राबविणारी पन्नास कारागृहे आतापर्यंत ब्राझीलमध्ये असून, आणखी शंभर कारागृहे या कल्पनेचा अवलंब करण्यास सज्ज होत आहेत. वाल्डेची यांच्या कल्पनेचा अवलंब करीत, कैद्यांना कारागृहामध्ये नेमून देण्यात आलेल्या दैनंदिन कामाच्या शिवाय, मनासारखे शिक्षण घेण्याची, आणि मनाजोगता छंद जोपासण्याची देखील मुभा आहे. या कैद्यांच्या कोठडयांना कुलुपांची बंधने नाहीत. प्रत्येक कैदी सकाळी उठून ठरल्या वेळेला आपापल्या कामाच्या ठिकाणी हजर असतो. रोजचे नेमून दिलेले काम करण्यासोबतच त्यांना हवे त्या विषयाचे शिक्षण घेण्याची आणि हवे ते छंद जोपासण्याची व्यवस्था या कारागृहांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
jail2
या कारागृहांमध्ये पहारे किंवा बंदुकधारी पोलीस पहावयास मिळत नाहीत. इतकेच नाही तर इथे कैद्यांची ओळख त्यांना देण्यात आलेला विशेष क्रमांक सांगत नसून, प्रत्येक कैद्याला त्याच्या नावाने ओळखले जाते. येथे कारागृहामध्ये करावयाच्या कामासोबतच कैद्यांना व्यावसायिक प्रशिक्षणही उपलब्ध करुन दिले जाते, जेणेकरून कारागृहाच्या बाहेर पडल्यानंतर यांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होऊ शकेल. कैद्यांनी देखील या नव्या जीवनशैलीचा स्वीकार केला असून, त्यांच्या जीवनावर या उपक्रमाचा सकारत्मक परिणाम पहावयास मिळत आहे.

Leave a Comment