व्यायामासाठी वापरण्यात येणाऱ्या कपड्यांमधून घामाची दुर्गंधी अशी करा दूर.

smell
व्यायाम करीत असताना पुष्कळ घाम येत असतो. अंगावरील कपड्यांमध्ये हा घाम शोषून घेतला जात असतो. अंगावरील कपडे घामाने ओले झाले असता, त्यामध्ये व्यायाम सुरु ठेवणे अडचणीचे होऊ लागते. ही अडचण दूर करीत व्यायाम करताना घाम शोषून घेण्यासाठी आणि चटकन वाळण्यासाठी आजकाल ‘ड्राय फिट’ पद्धतीचे कपडे खास व्यायामप्रेमी मंडळींसाठी तयार करण्यात येत असतात. व्यायाम करताना वापरण्यात येणाऱ्या कपड्यांमुळे शरीरावरील घाम जरी शोषून घेतला जात असला, तरी अनेकदा या कपड्यांमधील घामाची दुर्गंधी मात्र कपडे धुतल्यानंतरही हटत नाही. ही दुर्गंधी दूर करण्यासाठी काही उपायांचा अवलंब करता येऊ शकेल.
smell1
आजकाल व्यायामासाठी खास बनविण्यात येणाऱ्या कपड्यांमध्ये अतिशय सूक्ष्म छिद्रे असतात. पण शरीरावरील घाम, बाहेरील वातावरणातील प्रदूषण, किंवा धुळीचे कण, त्वचेचा तेलकटपणा, कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारे डीटर्जंट इत्यादी कपड्यातून व्यवस्थित साफ न झाल्याने याचे कण या सूक्ष्म छिद्रांमध्ये अडकून राहतात, आणि त्यामुळे कपडा धुतल्यानंतर त्यातून विशिष्ट दुर्गंधी येत राहते. ही दुर्गंधी हटविण्यासाठी सर्वप्रथम व्यायाम करून झाल्यानंतर जर कपडे घामाने थोडेच ओले झाले असतील, तर हे कपडे आधी हवेवर चांगले वाळू द्यावेत. कपडे धुण्यासाठी अधिक साबण वापरला तर कपडे अधिक स्वच्छ होतात हा गैरसमज आहे. वास्तविक प्रत्येक पद्धतीचा कपडा ठराविक साबणाच्या मात्रेने स्वच्छ होणारा असतो. तसेच कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनमध्ये देखील ठराविक प्रमाणातच साबण वापरला जाणे आवश्यक असते. त्यामुळे या पेक्षा अधिक साबण वापरला गेल्यास कपडे खळबळून धुवूनही हा साबण त्यातून पूर्णपणे निघत नाही. कपड्यातील साबण पूर्णपणे काढून न टाकताच कपडा वाळवला गेला तर यामुळेही कपड्यामध्ये दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे साबणाचा आवश्यक तितकाच वापर केला जाणे आवश्यक आहे.
smell2
व्यायामाचे कपडे धुण्यासाठी ‘फॅब्रिक सॉफनर’ चा वापर करू नये. कपडे साबणाने धुतल्यानंतर ते न आकसता मुलायम आणि सुगंधी राहावेत या करिता फॅब्रिक सॉफनरचा वापर करण्यात येतो. पण याचा वापर व्यायामासाठी वापरण्यात येणाऱ्या कपड्यांसाठी केला असता, यामुळे कपड्यावरील सूक्ष्म छिद्रे बुजण्याची शक्यता असते. जर ही छिद्रे बुजली, तर कपडा स्वच्छ होत नाही आणि त्यातून दुर्गंधी येऊ लागते. त्याचप्रमाणे सॉफनरच्या वापराने कपड्याचा आकार आणि फिट बिघडण्याची देखील शक्यता असते. जर व्यायामाचे कपडे घामाने भिजून खूपच ओले झाले असतील तर मात्र हे कपडे हवेवर वाळू न देता त्वरित धुणे योग्य ठरते. कपडे धुण्यापूर्वी ते उलटे करावेत, यामुळे तुमच्या त्वचेच्या संपर्कात आलेला कपड्याचा भाग व्यवस्थित धुतला जातो.
smell3
व्यायामाचे कपडे शक्यतो इतर कपड्यांच्या जोडीने धुणे टाळावे. तसेच हे कपडे धुताना पाण्यामध्ये थोडे व्हिनेगर घालून कपडे धुवावेत. व्हिनेगरमुळे कपड्यांमधील दुर्गंधी पूर्णपणे दूर होते. व्हीनेरगरचा वापर करायचा असल्यास आधी एका बादलीमध्ये चार भाग पाणी आणि एक भाग व्हिनेगरमध्ये कपडे भिजवून ठेवावेत आणि मग नेहमीप्रमाणे धुवावेत. कपडे धुतल्यानंतर हवेशीर ठिकाणी वाळवावेत. त्यामुळे कपड्यामधील दुर्गंधी नाहीशी होईल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment