ही आहे हैदराबादची खासियत- ‘मुन्शी नान’

naan
हैदराबादमधील खास खाद्यपदार्थांचा उल्लेख होताच ईदच्या दिवसांमध्ये ठिकठीकाणी मिळणारे चविष्ट ‘हलीम’ आणि गरमागरम हैदेराबादी बिर्याणीचे चित्र हटकून डोळ्यांसमोर उभे राहते. पण हैदेराबाद येथील आणखी एक खासियत आहे ‘मुन्शी नान’. चौकोनी आकाराचा हा अतिशय चविष्ट नान जर एकदा तुम्ही चाखालात, तर त्याची चव तुमच्या जिभेवर कायम रेंगाळत राहील. १८५१ साली मोहम्मद हुसेन साहेब या निझाम दरबारी कार्यरत असणाऱ्या कारकुनाने प्रथम तयार केलेला हा पदार्थ आहे. तेव्हापासून या पदार्थाला ‘मुन्शी नान’, म्हणजेच कारकुनाने तयार केलेला नान, या नावाने ओळखले जाते. तेव्हापासून हैदराबाद येथील पुरानी हवेली येथे गेली वर्षानुवर्षे हे नान तयार केले जात असून, हैदराबाद येथील सर्वाधिक लोकप्रिय पदार्थांपैकी असा हा पदार्थ आहे.
naan1
हे नान बनविण्याची परंपरा गेली १६७ वर्षे अव्याहत सुरु आहे. मोहम्मद हुसेन साहेबांच्या पाचव्या पिढीतील लोक आजच्या काळामध्ये हा नान बनविण्याचा व्यवसाय चालवीत आहेत. जेव्हापासून हे नान प्रथम बनविले गेले तेव्हापासून ते आजतागायत त्यांची चव आणि अव्वल दर्जा कायम आहे, आणि हीच त्यांची खासियत आहे. हे नान सामान्य पोळीच्या मानाने पुष्कळ जाड दिसत असले, तरी अतिशय मुलायम असून, हे इतर पोळ्यांच्या किंवा पराठ्यांच्या मानाने अधिक काळ गरम राहणारे असतात.
naan2
एका मुन्शी नानची किंमत केवळ चौदा रुपये असून, हैदराबादमध्ये हे नान अतिशय लोकप्रिय आहेत. सर्वसाधारणपणे गरमागरम चविष्ट, मसालेदार मांसाहारी पदार्थांच्या जोडीने हे नान खाल्ले जातात. या नानच्या जोडीने विशेष करून ‘मरग’ हा पदार्थ खाल्ला जातो. जर कधी हैदेराबादला जाणे झालेच तर हा चविष्ट ‘मुन्शी नान’ चाखण्यास विसरू नका.

Leave a Comment