जीभेवरील पांढरा थर दूर करण्याकरिता आजमावा हे उपाय

tongue
एखाद्या आजाराचे निमित्त होऊन डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेल्यावर डॉक्टर सर्वात आधी डोळे आणि जीभ पाहतात. जीभ पाहण्यामागे काही विशिष्ट कारण असते. आपली जीभ आपल्या आरोग्याचा आरसा म्हणता येऊ शकेल. आपल्या शरीराचे पचनतंत्र आणि लिव्हर व्यवस्थित काम करीत आहे किंवा नाही याचे सूचक आपली जीभ असते. अनेकदा आपल्या जिभेवर पांढरा, पिवळसर किंवा भुरकट रंगाचा थर दिसून येतो. जिभेवर अश्या प्रकारचा थर असणे लिव्हर आणि पचन तंत्राचे कार्य सुरळीत सुरु नसल्याचे लक्षण आहे. दररोज दात घासण्यासोबत जीभही घासणे आवश्यक असून, त्यामुळे हिरड्या, दात आणि श्वासाच्या दुर्गंधीशी निगडित समस्या नाहीशा होण्यास मदत होते. जीभेवरील पांढरा थर नाहीसा करण्यासाठी काही उपायांचा अवलंब करता येईल.
tongue1
कच्च्या लसुणाचे सेवन केल्याने तोंडातील घातक जीवाणूंचा नाश होतो. तसेच यामुळे पचनतंत्र चांगले राहते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी लसुणाची एक पाकळी पाण्याबरोबर घ्यावी. अॅलो व्हेराचा गर बहुगुणकारी आहे. याचा फायदा त्वचेसाठी आहेच, पण त्याशिवाय एक चमचा गर काही मिनिटे तोंडामध्ये धरल्याने तोंडातील जंतू नाहीसे होतात. हा एक चमचा गर तोंडामध्ये काही मिनिटे धरून ठेऊन नंतर थुंकून टाकावा. त्यानंतर एक ग्लास कोमट पाण्याने चुळा भरून टाकाव्यात. हा उपाय दिवसातून दोन वेळा करावा. काही दिवसातच जीभेवरील पांढरा थर, श्वासाची दुर्गंधी नाहीशी होईल.
tongue2
जीभ साफ करण्याकरिता मिठाचा वापर हा चांगला पर्याय आहे. यासाठी थोडे जाडसर मीठ वापरावे. मिठाच्या जाडसर कणांमुळे जीभेवरील थर निघून जाण्यास मदत होते, आणि जिभेवर साठलेल्या मृत पेशी हटण्यासही मदत होते. मिठाने जीभ चोळून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने चुळा भरून टाकाव्यात. हा उपायही दिवसातून दोन वेळा करावा. हळद जीवाणू प्रतिरोधी आहे. याचा वापर जीभेवरील पांढरा थर हटवून तोंडातील जीवाणू नष्ट करण्यासाठी देखील केला जातो. एक चमचा हळदीमध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालून याची जाडसर पेस्ट बनवून घ्यावी. ही पेस्ट जिभेवर चोळून लावावी, आणि दोन मिनिटे हलक्या हाताने जिभेवर मालिश करावी. त्यानंतर गरम पाण्याने चुळा भरून टाकाव्यात.
tongue3
जिभेवर पांढरा थर जमा होऊ नये या करिता अन्नसेवन प्रमाणामध्ये केलेले असावे. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी घेतलेले भोजन पचण्यास हलके असावे. वारंवार धूम्रपान आणि मद्यपान केल्याने देखील जिभेवर पांढरा थर दिसून येतो. यामुळे तोंडामध्ये घातक जीवाणू निर्माण होत असतात. तसेच पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. शरीरामध्ये पाण्याची मात्रा कमी असणे हे देखील जिभेवर पांढरा थर निर्माण होण्यामागचे कारण आहे. त्यामुळे जिभेवर पांढरा थर दिसून आल्यावर पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे. घराबाहेर काही कामानिमित्त जाताना देखील पाणी बरोबर असू द्यावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment