बीटाच्या अतिसेवनाने होऊ शकतात दुष्परिणाम

beetroot
बीट ही भाजी शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगली समजली जाते. पण आरोग्याच्या दृष्टीने एखादा पदार्थ कितीही चांगला असला, तरी त्याच्या अतिसेवनाने दुष्परिणाम उद्भवू शकतात. बीटाच्या अतिसेवनाने देखील शरीरावर काही दुष्परिणाम दिसून येण्याची शक्यता असते. हे दुष्परिणाम कोणते आहेत, ते जाणून घेऊ या. बीटाच्या अतिसेवनाने ‘गाऊट’ किंवा किडनी स्टोन्स सारख्या समस्या उद्भविण्याची शक्यता असते. तसेच बीटाच्या रसाच्या अतिसेवनाने शरीरामध्ये लोह, कॉपर, मॅग्नेशियम, लिव्हरमध्ये साठत राहून त्यामुळेही समस्या उद्भवू शकतात.
beetroot1
बीटाच्या अतिसेवनामुळे ‘बीट-युरिया’ दिसून येण्याची शक्यता असते. लघवीचा सामान्य रंग बदलून तो बीटाप्रमाणे लालसर होणे हे बीट-युरियाचे लक्षण आहे. तसेच ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल,त्यांच्या बाबतीत ही समस्या अधिक उद्भविते. ही समस्या फारशी गंभीर नसली, तरी यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. बीटामध्ये ‘ऑक्सलेट’ मुबलक मात्रेमध्ये असून, यांच्या अतिसेवनाने किडनी स्टोन्स होण्याची शक्यता असते. म्हणून ज्या व्यक्तींमध्ये आधीपासूनच किडनी स्टोन्सची समस्या असते, त्यांना बीट आहारातून कमी करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच ज्यांना ‘गाऊट’ हा विकार असेल, त्यांनाही बीट आहारातून वर्ज्य करण्याचा सल्ला दिला जातो.
beetroot2
बीटाच्या अतिसेवनाचे आणखी एक लक्षण म्हणजे शरीरावर येणारे बारीक पुरळ. हे लक्षण सामान्य नसून, अतिशय अभावानेच आढळते. बीटाच्या अतिसेवनाने अंगावर बारीक पुरळ उठणे, शरीरावर लालसर चट्टे उठणे, खाज सुटणे, आणि क्वचित थंडी वाजून ताप येणे अशी लक्षणेही पाहिली गेली आहेत. त्याचप्रमाणे बीटाचे सेवन केल्यानंतर आवाज बसण्याची समस्या दुर्मिळ असली, तरी पाहिली गेली आहे. बीटाच्या अतिसेवनाने पोटामध्ये गॅसेस होऊन पोटदुखी उद्भवू शकते. तसेच पोट फुगणे, बद्धकोष्ठ याही समस्या बीटाच्या अतिसेवनाने उद्भवू शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment